Belagavi

मराठा इन्फन्ट्रीच्या पहिल्या अग्निविरांची तुकडी देशसेवेत

Share

दिलेल्या कठोर लष्करी प्रशिक्षणाचा उपयोग करून मातृभूमीच्या रक्षणासाठी सदैव सज्ज रहा, सेवाकाळानंतरही एक चांगले नागरिक बनून देशसेवा करा असे आवाहन ज्युनियर लीडर्स विंगचे कमांडर मेजर जनरल आर. एस. गुराया, व्हीएसएम यांनी केले.
बेळगावातील मराठा लाईट इन्फन्ट्री रेजिमेंटल सेंटरमध्ये इन्फन्ट्रीच्या यशस्वीपणे प्रशिक्षण घेतलेल्या पहिल्या अग्निवीर तुकडीचा शानदार शपथविधी समारंभ आज शनिवारी इन्फन्ट्रीच्या तळेकर ड्रील स्क्वेअर मैदानात पार पडला. त्यावेळी प्रशिक्षित जवानांकडून मानवंदना स्वीकारल्यानंतर संबोधित करताना ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना मेजर जनरल आर. एस. गुराया यांनी 31 आठवड्यांचे खडतर लष्करी प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर देशसेवेत दाखल होणाऱ्या 111 अग्निवीर जवानांच्या मेहनतीबद्दल त्यांचे कौतुक केले.
भारतीय लष्कराच्या सर्वात जुन्या पायदळ रेजिमेंटपैकी एक असलेल्या मराठा लाईट इन्फंट्रीचा समृद्ध वारसा आणि गौरव सांगितला. सैनिकांच्या जीवनातील शिस्त आणि शारीरिक तंदुरुस्तीचे महत्त्व त्यांनी पुढे सांगितले. मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरमध्ये सुरू असलेल्या प्रशिक्षणावर विश्वास व्यक्त करून, हे प्रशिक्षण तरुण सैनिकांना चांगल्या स्थितीत उभे करतील अशी अपेक्षा व्यक्त केली.
केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेंतर्गत पहिल्या अग्निवीर तुकडीच्या प्रशिक्षणानंतर आज बेळगाव येथील मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर येथे लष्करी अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली प्रशिक्षणप्राप्त जवानांचा दीक्षांत संचलन सोहळा पार पडला. यावेळी जवानांनी प्रमुख पाहुण्यांना शानदार पथसंचलन करून मानवंदना दिली. तत्पूर्वी मेजर जनरल आर. एस. गुराया यांनी संचलनाची पाहणी करून मानवंदना स्वीकारली.
तसेच प्रशिक्षणादरम्यान उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अग्निवीर जवानांना विविध पदके व पुरस्कार प्रदान करण्यात आले. अग्निवीर अक्षय ढेरे यांना नायक यशवंत घाडगे उत्कृष्ट अग्निवीरचे व्हिक्टोरिया क्रॉस पदक प्रदान करण्यात आले.
यावेळी मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर बेळगावचे कमांडर ब्रिगेडियर जॉय मुखर्जी यांच्यासह वरिष्ठ लष्करी अधिकारी, प्रशिक्षणप्राप्त जवानांचे माता-पिता व कुटुंबीय उपस्थित होते.

Tags: