निकृष्ट दर्जाचे कोबीचे बियाणे पुरविणाऱ्या नर्सरी आणि कंपनीवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आज हातात खराब कोबी घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.
बेळगाव जिल्ह्यातील कित्तूर तालुक्यातील तिगडी, मर्डीनागलापूर भागातील अनेक शेतकऱ्यांना एका नर्सरीने आणि कंपनीने कोबी पिकाचे निकृष्ट बियाणे देऊन फसवणूक केली आहे. हे बियाणे पेरल्यावर 45 ते 50 दिवसातच कोबीचे गड्डे फुटून पसरले आहेत. त्यामुळे त्यांच्या पिकाला बाजारपेठेत मागणी नाही. परिणामी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे असा आरोप करत शेतकऱ्यांनी बेळगावात आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली.
यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना चिन्नापगौड व अन्य एका शेतकऱ्याने सांगितले की, आम्हाला एका नर्सरीकडून आणि कंपनीकडून सेंट कंपनीच्या बियाण्यापेक्षा सीझन्ट कंपनीचे बियाणे चांगले आहे, त्याचा उतारा चांगला येतो असे सांगून फसवणूक केली आहे. सुमारे दहा एकर क्षेत्रात आम्ही हे बियाणे पेरले असता, कोबी उगवला. मात्र केवळ 45 ते 50 दिवसातच कोबीचे गड्डे फुटून पसरले आहेत. त्यामुळे त्याची विक्री होत नसल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे आम्ही आज हे कोबी घेऊन येथे निदर्शने करत आहोत. जिल्हा प्रशासनाने याची दखल घेऊन संबंधितांवर कठोर कारवाई करून आम्हाला नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी केली.
यानंतर जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले. या निदर्शनात मरीगौडा पाटील, गदीगेप्प पाटील, बाबू माकेन्नावर, इरण्णा माकेन्नावर, गंगाप्पा माकेन्नावर आदींनी भाग घेतला.
Recent Comments