Belagavi

जायंट्स सखीतर्फे “पौगंडावस्थेतील मुलींसोबत संवाद” कार्यक्रम

Share

किशोरवयीन मुलींनी आरोग्य, आहाराकडे लक्ष देत स्वतःवर नियंत्रण ठेवावं असा सल्ला पुणे येथील मानसोपचार सल्लागार उज्वला भोईर-नागपुरे यांनी दिला.जायंट्स सखीच्या वतीने जिजामाता हायस्कूलमध्ये “पौगंडावस्थेतील मुलींसोबत संवाद” कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी बोलताना उज्वला भोईर-नागपुरे पुढे म्हणाल्या की, मुलांना योग्य वयात योग्य गोष्टी समजावून सांगितल्या नाहीत, तर मुलं चुकीच्या मार्गाला जाऊ शकतात. किशोरावस्थेत मुलांच्या मनात अनेक संभ्रम निर्माण होत असतात. त्यामुळे त्यांच्याशी संवाद साधणे गरजेचे आहे. यावेळी उज्वला भोईर यांनी, मुलींशी संवाद साधताना अनेक गोष्टींचा उलगडा केला. आपण या वयात कोणत्या पध्दतीने वागलं पाहिजे, कोणत्या सवयी लावून घेतल्या पाहिजे, नको त्या भावनांमध्ये न अडकता भविष्याचा विचार करून अभ्यासाकडे लक्ष केंद्रित केलं पाहीजे, आपल्या आसपासच्या लोकांकडून होणारा चांगला-वाईट स्पर्श ओळखता आला पाहिजे. शारीरिक भावनिक वाढ होताना काही अडचणी आल्यास आपल्या आईसोबत, मावशी सोबत किंवा आत्यासोबत बोलून शंकाचं निरसन करून घेतलं पाहिजे. अशा वयात विरुद्ध लिंगी व्यक्तीबद्दल आकर्षण असणे साहजिक आहे पण त्यातून स्वतःला सावरणे अत्यंत गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.


प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करून करण्यात आले. अध्यक्षा विद्या सरनोबत यांनी उज्वला भोईर यांचा शाल आणि गुलाबपुष्प देऊन स्वागत केले व उपस्थिताना सदगुरु वामनराव पै यांचे ग्रंथ देण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर मुख्याध्यापक एन डी पाटील,सखीच्या माजी अध्यक्षा चंद्रा चोपडे आणि सचिव सुलक्षणा शिनोळकर उपस्थित होत्या. त्यानंतर उज्वला भोईर यांनी साऱ्या विद्यार्थीनीना वेगवेगळ्या गाण्यावर नृत्य करण्यास लावून उत्साहित केले. कार्यक्रमासाठी संजीवनी फौंडेशनच्या सविता देगीनाळ यांचे विशेष सहकार्य लाभले.
यावेळी सखीच्या संस्थापिका अध्यक्षा ज्योती अनगोळकर, उपाध्यक्ष अपर्णा पाटील, शीतल पाटील, राजश्री हसबे, वृषाली मोरे, वैशाली भातकांडे, लता कंग्राळकर, अर्चणा कंग्राळकर, शीला खटावकर व शाळेच्या शिक्षिका उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शिक्षिका अंजली चव्हाण यांनी केले तर आभार सचिव सुलक्षणा शिनोळकर यांनी मानले.

Tags: