Belagavi

‘गृहलक्ष्मी’ नोंदणीसाठी प्रति लाभार्थी 250 रुपयांची लूट; सेंटर्सना अधिकाऱ्यांनी ठोकले टाळे

Share

दुसऱ्या ग्रामवन केंद्राचा लॉग इन आयडी वापरून ‘गृहलक्ष्मी’ योजनेच्या नोंदणीसाठी प्रति लाभार्थी 250 रुपयांची लूट करणाऱ्या बेळगावातील ऑनलाईन सेंटरला अधिकाऱ्यांनी आज टाळे ठोकले. त्याचप्रमाणे लॉग इन आयडी वापरू देणाऱ्या मुतगा येथील केंद्रही  करण्यात आले.

गृहलक्ष्मी योजना नोंदणीसाठी सध्या सर्वत्र मोठी धावपळ सुरु आहे. पहाटेपासूनच महिला लाभार्थी तसेच त्यांचे कुटुंबीय अगदी लहान मुलेदेखील सरकारी व सरकारमान्य रांगेत थांबून नंबर लावत आहेत. याचाच गैरफायदा घेत काही सरकारमान्य ग्रामवन केंद्र चालक व खासगी ऑनलाईन केंद्र चालकांकडून लाभार्थींची लूटमार सुरु असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.

गावपातळीवरील ग्रामवन केंद्रांना या योजनेची नोंदणी करण्यासाठी लाभार्थींची माहिती गुप्त राखण्याचे बंधन घालण्यात आले आहे. मात्र या अटींचे उल्लंघन करून आपल्या फायद्यासाठी दुसऱ्या केंद्राचा लॉग इन आयडी वापरून खासगी ऑनलाईन केंद्रांकडून नोंदणी केली जात आहे. याबाबत तक्रार आल्याने महिला व बालकल्याण खात्याचे उपसंचालक, तहसीलदार आणि अधिकाऱ्यांनी चव्हाट गल्लीतील मारुती मंगल कार्यालयाशेजारी

अदृश्य आर. टी. यांच्या जनता ऑनलाईन सेंटरवर छापा मारला. यावेळी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी केलेल्या अर्जाच्या आधारे तपासणी केली असता, मुतगा येथील किरण चौगला यांच्या ग्रामवन केंद्राला मंजूर केलेला लॉग इन आयडी वापरून लाभार्थींची नोंदणी केली जात असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर दोन्ही केंद्रांना टाळे ठोकण्यात आले.
या कारवाईमुळे खासगी ऑनलाईन केंद्र व सरकारमान्य ग्रामवन केंद्र चालकाच्या एकच खळबळ माजली असून लाभार्थ्यांनी मात्र कारवाईचे स्वागत केले आहे.

Tags: