Belagavi

उद्यमबाग पोलिसांकडून एकाला भर रस्त्यावर बेदम मारहाण; व्हिडिओ व्हायरल

Share

बेळगावातील उद्यमबाग पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक आणि पोलिसांनी एका व्यक्तीला भर रस्त्यावर बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे. पोलिसांची ही कृती कितपत कायदेशीर आहे असा प्रश्न आता निर्माण झालाय.

बेळगावातील उद्यमबाग पोलीस त्यांच्या एका वादग्रस्त कृतीमुळे चर्चेत आले आहेत. वास्तविक पोलीस कोठडीत देखील संशयिताला मारहाण करू नये असा कायदा असताना उद्यमबाग पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सरदार मुतट्टी, तसेच पोलीस मेत्री, रेवप्पा आणि मल्लाप्पा पुजारी या चौघांनी मिळून एका व्यक्तीला भर रस्त्यात सगळ्यांसमोर लाथाबुक्क्याने तुडवत बेदम मारहाण केली आहे. कोणी जनावरालाही मारणार नाही इतक्या क्रूर पद्धतीने त्यांनी मारहाण केल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे. त्यामुळे पोलिसांची ही कृती कितपत योग्य आहे असा प्रश्न विचारण्यात येत आहे. या मारहाणीत संबंधित व्यक्तीला काही इजा झाली असती किंवा त्याचे प्राण गेले असते तर त्याला कोण जबाबदार असते? असाही प्रश्न उपस्थित झाला आहे.
दरम्यान, या संदर्भात इन न्यूजने पीएसआय सरदार मुतट्टी यांच्याशी संपर्क साधला असता, संबंधित व्यक्ती दारू पिऊन लोकांना शिवीगाळ करत होता, दंगा घालून त्यांना त्रास देत होता अशी तक्रार लोकांकडून आली होती. म्हणून ही कारवाई करावी लागल्याचे समर्थन त्यांनी केले.
काहीही असले तरी, पोलीस कोठडीत देखील संशयिताला मारहाण करू नये असा कायदा असताना देखील भर रस्त्यावर एखाद्याला अशा पद्धतीने बेदम मारहाण करणे कितपत योग्य आहे? रस्त्यावर कायदा हातात घेणाऱ्या पोलिसांवर आता बेळगावचे वरिष्ठ पोलीस अधिकारी काय कारवाई करणार याकडे शहरवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे.

Tags: