Belagavi

काँग्रेस सरकारच्या विरोधात भाजपचे बेळगावात आंदोलन

Share

राज्यातील ढासळलेली कायदा आणि सुव्यवस्था, दहशतवादी कारवाया, दरवाढ, हमी घोषणेची अंमलबजावणी करण्यात आलेले अपयश आणि भाजप आमदारांचे निलंबन याच्या निषेधार्थ बेळगाव जिल्हा भाजपतर्फे शहरातील चन्नम्मा चौकात जोरदार आंदोलन छेडण्यात आले.

बेळगाव जिल्हा भाजपतर्फे बेळगावातील चन्नम्मा सर्कलमध्ये घोषणाबाजी करत निदर्शने करून राज्यातील काँग्रेस सरकारचा निषेध करण्यात आला. वाढती महागाई, काँग्रेस सरकारची घटनाविरोधी धोरणे, ढासळणारी कायदा व सुव्यवस्था, वीजबिल, दूध दरवाढ, गोहत्या बंदी, धर्मांतर बंदी, एपीएमसी कायदे रद्द करणे, भाजप आमदारांचे निलंबन आदींच्या निषेधार्थ आणि दहशतवादी अटक प्रकरणाची राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून चौकशी करण्याच्या मागणीसह विविध मुद्द्यांवर भाजपच्या राज्यव्यापी आंदोलनाचा भाग म्हणून हे आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेस सरकारच्या विरोधात भाजप कार्यकर्त्यांनी आक्रमक होत घोषणाबाजी केली. विधान परिषदेचे माजी सदस्य महांतेश कवटगीमठ यांच्यासह अन्य नेत्यांनी निदर्शकांना संबोधित केले.
यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना भाजप महानगर जिल्हाध्यक्ष व माजी आमदार अनिल बेनके म्हणाले की, राज्यातील काँग्रेस सरकार जनविरोधी, हिंदुविरोधी धोरणे राबवित आहे. गोहत्या बंदी, धर्मांतर बंदी, एपीएमसी कायदे रद्द करून काँग्रेस सरकारने हिंदूंच्या विरोधात, शेतकरी, कष्टकऱ्यांच्या विरोधात कारभार सुरु केला आहे. त्यांच्या निषेधार्थ आम्ही हे आंदोलन छेडले आहे.

भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष माजी आमदार संजय पाटील म्हणाले की, देशातील विरोधी पक्षांच्या बैठकीवेळी सरकारने आयएएस अधिकाऱ्यांना नेत्यांच्या सेवेत जुंपून नियमांचा भंग केला आहे. भाजपच्या काळात कधीही पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा कोणीही दिली नव्हती. मात्र राज्यात काँग्रेस सत्तेवर आलेल्या दिवशीच बेळगावात अशी घोषणा देण्यात आली. काँग्रेस सत्तेवर येताच राज्यात मुनी, साधू-संतांवर अत्याचार वाढले आहेत. हिंदू कार्यकर्त्यांना खोट्या गुन्ह्यांत अडकवण्यात येत आहे. गॅरंटी योजनांच्या अंमलबजावणीत सरकारला अपयश आले आहे. मोदींसारख्या राष्ट्रभक्त नेत्यावर हलक्या शब्दांत टीका करणाऱ्या मुख्यमंत्री सिद्दरामय्या यांनी अहंकार सोडून द्यावा. दुसऱ्या देशाचा पंतप्रधान मोदींचे जाहीरपणे पाय धरून नमस्कार करतो यावरून मोदींचे मोठेपण स्पष्ट होते. सरकारच्या धोरणामुळे राज्यातील गरीब रिक्षा व टॅक्सी चालक आज रस्त्यावर आले आहेत. सरकारच्या अपयशाच्या निषेधार्थ आम्ही हे आंदोलन करत आहोत असे त्यांनी सांगितले.
भाजप राज्यप्रवक्ता एम. बी. जिरली म्हणाले की, काँग्रेस सरकार राज्यातील शेतकरी, कष्टकरी आणि हिंदूंच्या विरोधात धोरण राबवत आहे. कसलीही पूर्वतयारी न करता गॅरंटी योजना राबवून त्यांचा फज्जा उडवला आहे. लोकांच्या डोळ्यात धूळफेक करण्याचे काम हे सरकार करत आहे.

यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेस सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. निदर्शनात खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर, उज्ज्वला बडवाण्णाचे, भाजप महानगर सरचिटणीस मुरगेंद्रगौडा पाटील, डॉ. रवी पाटील, अभय अवलक्की, शरद पाटील, सविता कट्टी, शिल्पा केकरे, कल्पना इटगी यांच्यासह माजी आमदार, जिल्ह्यातील भाजप नेते व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Tags: