Belagavi

माहेश्वरी अंधशाळेसमोरील रस्त्याची दुरवस्था; विद्यार्थ्यांचे हाल

Share

नेहरूनगर, बेळगाव येथील कोल्हापूर सर्कल ते सुभाषनगर या माहेश्वरी अंधशाळेसमोरील रस्त्याची दुरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी रस्ता खचून मोठमोठे खड्डे पडल्याने पादचाऱ्यांचा तसेच निष्पाप अंध विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत.

बेळगावातील नेहरूनगर येथील कोल्हापूर सर्कल ते सुभाषनगर या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. या ठिकाणी 24X7 पाणीपुरवठा योजनेसाठी संबंधित कंत्राटदाराने रस्ता खोदाई करून पाईपलाईन घातली आहे. त्यावेळी रस्ता नीट बुजवण्यात आला नव्हता. पाणी योजनेचे पाईपदेखील रस्त्याच्या कडेला टाकून दिले आहेत. परिणामी पावसात रस्ता खचून जागोजागी दीड ते दोन फुटांचे मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे त्यात पडून अनेक वाहनचालक, पादचारी आणि विध्यार्थी जखमी होत आहेत. याच रस्त्यावर बेळगावातील जुनी व एकमेव माहेश्वरी अंधशाळा आहे. शहर आणि जिल्ह्यातील अनेक अंध विध्यार्थी या शाळेला रोज ये-जा करतात. दैवानेच दृष्टी हिरावून घेतलेल्या या निष्पाप मुलांना या रस्त्यावरून शाळेला जातायेताना नाहक अडचण होत आहे. अनेक विध्यार्थी येथील खड्ड्यात पडून जखमी झाले आहेत. फ्लो
या संदर्भात प्रसारमाध्यमांना माहिती देताना माहेश्वरी शाळेतील अंधशिक्षक जिन्नाप्पा टकाई यांनी सांगितले की, या रस्त्यावर अनेक मोठमोठे खड्डे पडल्याने येथून चालणेही कठीण झाले आहे. तशातच या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहने पार्किंग केली जातात. त्यामुळे अडचणीत भर पडते. त्यामुळे वाहतूक पोलिसांना पार्किंग बंदी करण्याची आणि मनपा-नगरसेवकांना रस्ता दुरुस्त करण्याची मागणी केली आहे.

माहेश्वरी अंधशाळेच्या प्राचार्या अनिता गावडे यांनी सांगितले की, अनेक अंध मुले दूरवरच्या गावातून आमच्या शाळेत शिकायला येतात. नादुरुस्त रस्त्यामुळे त्यांना शाळेत येजा करताना खूप त्रास होत आहे. सामान्य माणसाला देखील येथून चालणे कठीण होते, मग अंध मुलांची काय कथा? कंत्राटदाराने ड्रेनेज, पाइपलाइनचे काम अर्धवट सोडल्याने खड्डे पडून रस्ता खचला आहे. त्यात बेसुमार पार्किंगमुळे रस्ता आणखी अरुंद होऊन चालण्यासही जागा रहात नाही. त्यामुळे आम्ही आज नगरसेवक आणि प्रसारमाध्यमांना बोलावून ही परिस्थिती निदर्शनास आणत आहोत. महानगरपालिकेने त्वरित याची दखल घेऊन रस्ता दुरुस्त करून द्यावा अशी मागणी त्यांनी केली.

स्थानिक नगरसेवक बाबाजान मतवाले म्हणाले की, 24X7 पाणीपुरवठा योजनेचे पाईप घालण्यासाठी या रस्त्याची खोदाई करण्यात आली होती. हे काम पूर्ण होऊन सहा महिने झाले तरी कंत्राटदाराने उरलेले पाईप हटवले नाहीत. रस्त्याची दुरुस्ती न केल्याने खड्डे पडले आहेत. त्यामुळे अंध विध्यार्थी आणि पादचाऱ्यांना, वाहनचालकांना अडचण येत आहे. त्यांच्या समस्या मी ऐकून घेतल्या असून, वाहतूक पोलीस निरीक्षकांच्या निदर्शनास आणल्या आहेत. त्यांनी हा रस्ता एकेरी मार्ग केला आहे. आता पालिका आयुक्तांना पत्र देऊन रस्त्याच्या त्वरित दुरुस्तीसाठी विनंती करणार असल्याचे त्यांनी सांगितले.


एकंदर, या खराब रस्त्यामुळे निष्पाप अंध मुलांचे मोठे हाल होत आहेत. मनपाने तातडीने हा रस्ता दुरुस्त करून द्यावा अशीच सगळ्यांची इच्छा आहे.

Tags: