Belagavi

ओमनगरमधील रस्त्यांची दुरवस्था; किमान तात्पुरती दुरुस्ती करण्याची मागणी

Share

बेळगावातील ओमनगर वसाहतीत असलेल्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सध्या किमान तात्पुरती दुरुस्ती करून दिलासा द्यावा अशी मागणी येथील रहिवाशांनी केली आहे.

: बेळगावमध्ये स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत विकासकामांना सुरुवात करण्यात आली आहे, तेव्हापासून अनेक तक्रारींच्या भोवऱ्यात स्मार्ट सिटीचे काम अडकले आहे. ओमनगर भागात पक्क्या रस्त्यांचे काम न झाल्यामुळे पावसामुळे दलदल निर्माण झाली आहे. याठिकाणी सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले असून सध्या पावसाने लावलेल्या जोरदार हजेरीमुळे या चिखलातून मार्ग काढताना नागरिकांना कसरत करावी लागत आहे. अनेक दुचाकीस्वार या चिखलमय रस्त्यावरून मार्ग काढताना घसरून पडत आहेत. या भागात चोहोबाजूंनी रस्ते चिखलमय झाले असून रस्त्यावरील काही ड्रेनेज वाहिन्यांची झाकणे उघडीच असल्याने रात्रीच्यावेळी मोठ्या प्रमाणात या भागात अपघात होत आहेत असे रहिवाशांचे म्हणणे आहे

या संदर्भात इन न्यूजशी बोलताना स्थानिक रहिवासी सतीश मुतकेकर यांनी सांगितले की, आमदार अभय पाटील यांच्याहस्ते रस्ता कामाचे भूमिपूजनही पार पडले आहे. मात्र आता सरकार बदलल्याने काम रखडले आहे. पुन्हा निविदा मागवून ते करावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. आमदार अभय पाटील यांनी या भागात गटारी, पथदीप, पाणी अशा अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याप्रमाणेच रस्त्यांचे कामही ते करून देतील अशी आशा आहे. मात्र सध्या पावसामुळे या भागात चिखल निर्माण होऊन लहान मुलांना व रहिवाशांना त्रास होत आहे. त्यामुळे किमान खडी घालून तात्पुरती दुरुस्ती तरी करून द्यावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

अन्य एका स्थानिक रहिवाशाने सांगितले की, ओमनगर पूर्व भागातील रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. चिखल, खड्ड्यांमुळे विध्यार्थी वाहतुकीच्या रिक्षा, वाहने येथे आतपर्यंत येत नाहीत. त्यामुळे पालकांना विशेषतः महिलांना त्या वाहनांपर्यंत मुलांना सोडून यावे लागत आहे. दरवर्षी येथे पावसाळ्यात चिखलामुळे त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे येथील रस्ते लवकर सुधारले पाहिजेत अशी मागणी त्यांनी केली.

एकंदर, ओमनगर भागातील रस्त्यांची समस्या तातडीने सोडविण्यात यावी, अशी मागणी येथील नागरिक करत आहेत.

Tags: