Belagavi

मच्छे नगरपंचायतीला 90 लाख रुपये खर्चातून वाहने

Share

बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांच्या प्रयत्नातून स्थानिक लोकप्रतिनिधी विकास निधीतून 90 लाख रुपये खर्चातून खरेदी केलेल्या विविध वाहनांचा लोकार्पण सोहळा आज पार पडला. मच्छे नगरपंचायतीला ही वाहने देण्यात आली आहेत.

15 वा वित्त आयोग, स्वच्छ भारत मिशन आणि राज्य वित्त आयोगाच्या निधीतून आमदार अभय पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून मच्छे नगरपंचायतीसाठी विविध वाहने खरेदी करण्यात आली आहेत. एक वर्षांपूर्वी हा निर्णय घेण्यात आला होता. यासाठी आमदार अभय पाटील यांनी सतत पाठपुरावा केल्यावर सहा महिन्यांपूर्वी निधी मंजूर झाला. त्यानंतर या वाहनांची खरेदी करण्यात आली. आज समारंभपूर्वक मच्छे नगरपंचायतीला यांच्याहस्ते ही वाहने सुपूर्द करण्यात आली.

यावेळी बोलताना आमदार अभय पाटील म्हणाले की, गावच्या विकासात केवळ रस्ता, गटारी, पथदीप एवढेच विषय येत नाहीत. तर कचऱ्याची उचल, कचरावाहू वाहने, मैला वाहून नेणारी वाहने, पाणी पुरवठ्यासाठी टँकर आदी गोष्टीही लागतात. त्यामुळे या वाहनाच्या खरेदीचा प्रस्ताव तयार करून सरकारला पाठवला होता. तो मंजूर होऊन निधी मंजूर झाल्यावर ही वाहने खरेदी करण्यात आली आहेत. 30 लाख रुपये खर्चातून सक्शन मशीन वाहन, 35.5 लाख रुपये निधीतून जेसीबी, 11 लाख रुपये निधीतून ट्रॅक्टर व ट्रेलर, 2.50 लाख रुपये निधीतून पाण्याचा टँकर, 12 लाख रुपये निधीतून 3 क्युबिक टिप्पर खरेदी करण्यात आले आहेत. या वाहनांचा सदुपयोग करून नगरपंचायतीच्या हद्दीतील गावांचा विकास साधण्याचे आवाहन त्यांनी केले.


यावेळी मच्छे नगरपंचायतीचे व संबंधित खात्यांचे अधिकारी, सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: