धर्मस्थळ हे केवळ धार्मिक क्षेत्र नाही तर ते गरीब आणि जनतेच्या समृद्धीसाठी काम करत आहे. धर्मस्थळ संघांनी बचतीतून अनेक कुटुंबाना जगण्याचा मार्ग दाखवला आहे असे गौरवोद्गार कोन्नूर नगरपालिकेचे ज्येष्ठ सदस्य प्रकाश करनिंग यांनी काढले.कोन्नूर येथील धर्मस्थळ ग्राम विकास प्रकल्पातर्फे शनिवारी महिला ज्ञान विकास कार्यक्रमाच्या अंतर्गत केएलई इस्पितळाच्या सहकार्याने नागरिकांसाठी आणि धर्मस्थळ संघांच्या सदस्यांसाठी आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिराच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. धर्मस्थळ संघांनी राज्यातील असंख्य गोरगरीब महिला व त्यांच्या कुटुंबाना बचतीतून जीवनाचा मार्ग दाखविला आहे. त्याचा लाभ संघांच्या सभासदांना घेता येईल, असे ते म्हणाले.
प्रमुख पाहुणे जनजागृती संघाचे अध्यक्ष सोमशेखर मगदूम म्हणाले की, आपण निरोगी असलो तर आपण कोणतेही काम योग्य पद्धतीने करू शकतो. आरोग्य शिबिरांमध्ये सहभागी होऊन आरोग्याकडे अधिक लक्ष दिले पाहिजे. त्यासोबतच आपण आपल्या शरीरासाठी चांगला आहार घेतला आणि आपल्या आरोग्याची काळजी घेतली तर आपल्याला डॉक्टरकडे जाण्याची गरजच भासणार नाही. गोळ्या हा केवळ तात्पुरता उपाय आहे, आपले आरोग्य आपल्या हातात आहे, असे ते म्हणाले.
जिल्हा संचालक लवकुमार म्हणाले की, गावाच्या सर्वांगीण विकासासाठी धर्मस्थळ संघातर्फे अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यापैकी एक आरोग्य तपासणी आहे. त्याचा सदुपयोग व्हायला हवा, असे ते म्हणाले.
आरोग्य तपासणी शिबिरात सुमारे 100 शिबिरार्थींनी सहभाग घेतला आणि बीपी, शुगर, नेत्र तपासणी, महिलांची तपासणी आणि ऍनिमिया तपासणी करण्यात आली.
यावेळी कोन्नूर महानगरपालिका आयुक्त मंगला तेली, संसाधन व्यक्ती केएलई इस्पितळाच्या स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर लक्ष्मी, नेत्रतज्ञ डॉक्टर शिवानी, मनपा सदस्य यल्लाप्पा गाडीवड्डर, मुत्तवा गुड्डाकायू, शाळेचे मुख्याध्यापक बी बी पागद, अधीक्षक आनंद, ज्ञान विकास समन्वय अधिकारी दिव्यश्री उपस्थित होते. तालुका नियोजन अधिकारी धर्मेंद्र यांनी स्वागत तर संतोष यांनी सूत्रसंचालन केले. दिव्यश्री यांनी आभार मानले.
Recent Comments