चिक्कोडी तालुक्यातील हिरेकोडी नंदीपर्वत जैन आश्रमाचे १०८ कामकुमारनंदी महाराज यांच्या हत्येच्या तपासात सत्य लपविण्याचा प्रयत्न राज्य पोलिसांकडून होत आहे. त्यामुळे हा तपास सीबीआयकडे सोपविण्याची मागणी बेळगाव दक्षिणचे आ. अभय पाटील व माजी आ. संजय पाटील यांनी केली.यासंदर्भात बेळगावात रविवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना आमदार अभय पाटील म्हणाले की, तपासाची एकंदर प्रक्रिया पाहता या प्रकरणात जैन समाजाला न्याय मिळण्याची शक्यता नाही. १०८ कामकुमारनंदी महाराज पैशाचा व्यवहार करत होते, त्यातूनच त्यांची हत्या झाल्याचे पोलीस सांगत आहेत. सर्वसंग परित्याग केलेले स्वामीजी पैशाचा व्यवहार करत म्हणणे चुकीचे आहे. पोलिसांनी या प्रकरणी अटक केलेल्या आरोपींची नावे प्रसिद्ध करू नका, त्यामुळे हत्येच्या तपासात अडचण येईल अशी विनंती प्रसारमाध्यमांनाही केली. दोन्ही आरोपींविरुद्ध सबळ पुरावे असतील तर दोघांचीही नावे जाहीर करण्यात पोलिसांना काय अडचण होती? यात हसन दलायत आणि नारायण माळी यांना अटक झाली असेल तर केवळ माळी याचेच नाव पोलिसांनी का जाहीर केले. कोणाला खुश करण्यासाठी हसन दलायतचे नाव लपविण्यात येत आहे? असा सवाल त्यांनी केला. मुनी बेपत्ता झाल्याचे आश्रम कमिटीच्या लोकांनी पोलिसांना सांगितल्यावर, तक्रार नोंदवून न घेता, आम्ही मुनींचा शोध घेऊ, तुम्हीही त्यांचा शोध घ्या असे पोलिसांनी का सांगितले? तक्रार नोंदवून घेऊन शोधकार्य का सुरु केले नाही? पोलीस सरकारच्या दबावाखाली येऊन मुख्य आरोपी हसनला वाचविण्याचा प्रयत्न करत आहेत का? यातून सरकार केवळ मुस्लिम समाजाचे रक्षण करत आहे का? असा संशय निर्माण होतो असा आरोप त्यांनी केला.
राज्यात काँग्रेस सरकार सत्तेवर येताच, निकालाच्या दिवशीच बेळगावात पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या. नुकतीच एका जिमचालक हिंदू तरुणाला मुस्लिम समुदायाने बेदम मारहाण केली. आता जैन मुनींच्या हत्या प्रकरणाचा निःपक्ष तपास न करता जैन मुनींचे आणि जैन समाजाचे नाव खराब करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ज्या स्वामीजींचे साधे बँक खाते नाही, ज्यांनी कपड्यांचाही त्याग करून निर्वाणवृत्ती स्वीकारली आहे, त्यांच्या खून्याचे नाव काँग्रेस सरकार का लपवून ठेवत आहे? सरकारच्या दबावाखाली पोलीस काम करत आहेत का? तपासाबद्दल प्रसिद्धीमाध्यमांना दिशाभूल करणारी माहिती पोलीस का देत आहेत? एक नंबरच्या आरोपीला दोन नंबरचा आणि दोन नंबरच्या आरोपीला एक नंबरचा आरोपी करण्यामागे काय कारण? हा सर्व घटनाक्रम पाहता या प्रकरणात जैन मुनींना आणि समाजाला न्याय मिळणे शक्य नाही. त्यामुळे हे प्रकरण सीबीआयकडे सोपवावे अशी मागणी आमदार अभय पाटील यांनी केली. यासाठी आज सुवर्णसौधसमोर सिद्धसेन मुनींच्या नेतृत्वाखाली महामार्ग रोखून आंदोलन करण्यात येईल. उद्या चिक्कोडीत जैन समाज मूक आंदोलन करणार आहे. भाजप नेत्यांशी चर्चा करून या प्रकरणी विधानसभेतही आवाज उठवणार असल्याचे त्यांनी सांगितले. बाईट.
माजी आमदार व बेळगाव ग्रामीण भाजप जिल्हाध्यक्ष संजय पाटील यांनीही जैन मुनींच्या हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याची मागणी केली. पोलिसांनी जैन नेत्यांना, आम्ही तपास करत आहोत, मुनींचा शोध घेऊ, तुम्ही आंदोलन करू नका, त्यामुळे तपासात अडचण येईल असे सांगितले. त्यानुसार जैन समाज प्रमुख शांत राहिले. पण हिरेकोडीला जाऊन पाहणी केल्यावर पोलीस दुटप्पी भूमिका घेत असल्याचे निदर्शनास आले. कामकुमारनंदी महाराज बेपत्ता झाल्याचे समजताच पोलिसांनी तक्रार नोंदवून न घेता शोध सुरु केला. मात्र तपासात ज्या प्रमुख आरोपीचे नाव आले त्याचे नाव न सांगता केवळ माळी याचेच नाव पोलीस सांगत आहेत, पैशांच्या व्यवहारातून मुनींची हत्या झाल्याचे सांगून निर्वाणवृत्ती स्वीकारलेल्या जैन मुनींचे आणि जैन समाजाचे नाव बदनाम करत आहेत. काँग्रेस सरकारच्या दबावाखाली येऊन पोलीस सत्य लपवत आहेत. त्यामुळे हे संपूर्ण प्रकरण तपासासाठी सीबीआयकडे सोपवावे अशी मागणी संजय पाटील यांनी केली. बाईट.
एकंदर, १०८ कामकुमारनंदी महाराज हत्या प्रकरण आता चांगलेच तापले आहे. जैन समाजानेही आता न्यायासाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. यावर राज्यातील काँग्रेस सरकार काय भूमिका घेते हे पहावे लागेल.
Recent Comments