award

मठ-मंदिरांमुळे समाज सुसंस्कृत होण्यास मदत : मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर

Share

मठ-मंदिरांमुळे समाज सुसंस्कृत होण्यास मदत होते असे मत महिला व बालकल्याण, दिव्यांग पुनर्वसन आणि ज्येष्ठ नागरिक सबलीकरण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी व्यक्त केले.
बेळगावातील लक्ष्मीटेकडी येथील हुक्केरी हिरेमठाच्या शाखेत रविवारी गुरुपौर्णिमा आणि दिव्यसत्संग उत्साहात पार पडला. त्यावेळी सत्कार स्वीकारून त्या बोलत होत्या. मठाचे प्रमुख चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजी यांच्या सानिध्यात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर पुढे म्हणाल्या, आपल्या संस्कृतीत मठ-मंदिरे आणि अध्यात्मिक केंद्रांना नेहमीच सर्वोच्च महत्व देण्यात आले आहे. कारण त्यांच्यामुळेच समाजावर भक्ती, श्रद्धेचे संस्कार रुजविले जातात. हुक्केरी हिरेमठ हे असेच हजारो भक्तांच्या श्रद्धेचे केंद्र आहे. चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजींनी माझ्यासह अनेक भक्तांचे पिता बनून मार्गदर्शन केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सगळे अध्यात्मिक, धार्मिक उन्नती साधून पावन होऊया असे आवाहन त्यांनी केले. आमदार असताना बेळगाव ग्रामीण मतदारसंघाला मी पूर्ण वेळ देऊ शकत होते. पण आता मंत्री झाल्याने संपूर्ण राज्याला वेळ द्यावा लागतोय. त्यामुळे मला दुसऱ्यांदा दुप्पट मताधिक्क्याने निवडून दिलेल्या ग्रामीण मतदार संघाला, तेथील जनतेला पूर्ण वेळ देता येत नाही याचा ताण मला आला आहे. पण स्वामीजींच्या मार्गदर्शनाखाली मी समतोल राखून कर्तव्य पार पाडेन अशी ग्वाही मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी यावेळी दिली.
यावेळी आशीर्वचन देताना चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजी म्हणाले की, काही वर्षांपूर्वी मी लक्ष्मी हेब्बाळकर आणि शशिकला जोल्ले यांना विधानसभेत जाल असा आशीर्वाद दिला होता. त्या दोघींनी आपल्या जनसेवेमुळे तो खरा करून दाखवलाय. लक्ष्मी हेब्बाळकर अत्यंत अभ्यासू, शिस्तीच्या आणि सहनशील लोकप्रतिनिधी आहेत. भविष्यात त्या समाजकारण आणि राजकारणात आणखी भरारी घेतील यात शंका नाही. ताणतणाव विसरून त्यांनी लोकसेवा करावी, त्यांना आणखी उज्ज्वल यश मिळेल असा आशीर्वाद स्वामीजींनी दिला.
प्रारंभी चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजी यांच्याहस्ते मंत्री हेब्बाळकर, विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, रेणुका-यल्लम्मा देवीवर आधारित ‘उदो-उदो’ कन्नड सिरियलचे दिग्दर्शक अरविंद आदी मान्यवरांचा म्हैसुरी फेटा, शाल, पुष्पहार, मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. फ्लो
यावेळी माजी नगरसेविका अनुश्री देशपांडे, एपीएमसी अध्यक्ष युवराज कदम, बुडा अभियंता महांतेश हिरेमठ, निरलगीमठ, सालीमठ, रजपूत यांच्यासह हुक्केरी हिरेमठाचे भक्त, वेदशाळेचे विध्यार्थी आदी उपस्थित होते.

Tags: