घाई-गडबडीत आणलेले शैक्षणिक धोरण कोणाच्या हिताचे ठरत नाही असे सांगत, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित आणि एकंदर राज्याचे हित लक्षात घेऊन कर्नाटक आपले स्वतःचे शैक्षणिक धोरण राबवेल असे संकेत उच्च शिक्षण मंत्री डॉ. एम. सी. सुधाकर यांनी दिले.
बेळगावातील अंजनेय नगरातील राणी चन्नम्मा विद्यापीठ संचलित संगोळ्ळी रायण्णा प्रथमदर्जा महाविद्यालयाच्या आवारात उभारलेल्या क्रांतिवीर संगोळ्ळी रायण्णा यांच्या पुतळ्याचे अनावरण केल्यानंतर ते बोलत होते. मंत्री सुधाकर पुढे म्हणाले की, विध्यार्थ्यांना पदवी प्राप्त केल्याबरोबर नोकरी-रोजगार मिळाला पाहिजे. पण त्यासाठी जागतिकीकरणाच्या पार्श्वभूमीवर नोकरी देणारे उद्योग-संस्थांच्या गरजा, अपेक्षा ओळखून अभ्यासक्रम आखण्याची आवश्यकता आहे. राज्यातील युवक-युवतींना रोजगाराभिमुख शिक्षण देणे हा आमच्या सरकारचा हेतू आहे. शैक्षणिक धोरण आखणे हे एक मोठे आव्हान आहे. पण ते टप्प्याटप्प्याने करणे भाग आहे. घाई-गडबडीने ते करण्यात अर्थ नाही. शाळा-महाविद्यालयांना मूलभूत सुविधा देण्याचेही मोठं आव्हान सरकारपुढे आहे. मात्र सरकार ते निश्चित पेलेल. ‘बोले तैसा चाले’ अशी मुख्यमंत्री सिद्दरामय्या यांची ख्याती आहे, त्यामुळे ते हे करून दाखवतील. सहाय्यक प्राध्यापकांचा प्रश्न कोर्टात आहे. त्यावर तोडगा निघेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. संगोळ्ळी रायण्णा हे देशभक्तीचे स्फुल्लिंग चेतविणारे प्रेरणाकेंद्र आहे. त्यांचा आदर्श घेऊन विध्यार्थ्यानी वाटचाल करावी असे आवाहन त्यांनी केले. बाईट.
सार्वजनिक बांधकाम खात्याचे व जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी म्हणाले की, महापुरुषांचा इतिहास बदलण्याचा, त्यातून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न काहीजण करत आहेत. तो हाणून पाडण्यासाठी आणि महापुरुषांपासून प्रेरणा घ्यावी यासाठी त्यांचे पुतळे आपण उभारतो. क्रांतिवीर संगोळ्ळी रायण्णा यांचा पुतळाही याच हेतूने उभारला आहे. चन्नम्मा विद्यापीठ आणि इतर विकासकामांसाठी पूर्वीच्या काँग्रेस सरकारने निधी दिला, पायाभरणी केली. दरम्यानच्या काळात विश्वगुरू बनायला निघालेल्यांनी त्याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला असा आरोप त्यांनी केला. सरकार महापुरुषांचा इतिहास बदलू देणार नाही, विकासाला आणि त्यातही शिक्षणाला अधिक प्राधान्य देईल असे जारकीहोळी यांनी सांगितले.
माजी मंत्री एच विश्वनाथ म्हणाले की, बेळगाव जिल्हा ही शूरांची भूमी आहे. येथील राणी चन्नम्मा, संगोळ्ळी रायण्णा, सिंदूर लक्ष्मण अशा अनेक क्रांतिकारकांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले. त्यांचा आदर्श बाळगण्यासाठी, त्यांची प्रेरणा घेण्यासाठी त्यांचे पुतळे उभारणे गरजेचे आहे. राज्याचे स्वतःचे नवे शैक्षणिक धोरण गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
स्वखर्चाने संगोळ्ळी रायण्णा पुतळा उभारलेले माजी मंत्री एच एम रेवण्णा यावेळी म्हणाले की, संगोळ्ळी रायण्णा यांच्यासारख्या शूरांची प्रेरणा विध्यार्थ्यांना सदैव मिळत रहावी या हेतूने त्यांचा पुतळा येथे उभारला आहे. त्यांचा आदर्श विध्यार्थ्यानी बाळगावा. संगोळ्ळी रायण्णा यांनी गनिमीकाव्याने लढून ब्रिटिशाना जेरीस आणले होते. त्यांचे नंदगड येथील समाधीस्थळ, संग्रहालय आणि संगोळ्ळी येथे उत्कृष्ट सैनिक शाळा बांधण्यासाठी सिद्दरामय्या यांनी पूर्वी मुख्यमंत्री असताना १६२ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. त्यातून आज एक आदर्श सैनिक शाळा उभारण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी विधानपरिषद सदस्य नागराजू यांनीही विचार मांडले. यावेळी राणी चन्नम्मा विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक रामचंद्र गौडा लवकरच निवृत्त होणार असल्याने त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या. तत्पूर्वी महाविद्यालयाच्या आवारात उभारलेल्या संगोळ्ळी रायण्णा यांच्या भव्य पुतळ्याचे मंत्री सुधाकर यांच्याहस्ते अनावरण करण्यात आले.
कार्यक्रमाला बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ उर्फ राजू सेठ, कर्नाटक उच्च शिक्षण मंडळाचे विशेष अधिकारी डॉक्टर एम जयप्पा, होस्पेट विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर बी के रवी, चन्नम्मा विध्यापीठाचे कुलसचिव शिवानंद गोरनाळे, राजश्री जैनापूर, प्राचार्य शंकर तेरदाळ आदी मान्यवर उपस्थित होते.
Recent Comments