यंदा पावसाला कधी नव्हे इतका विलंब झाल्याने बेळगाव जिल्ह्यातील शेतकरी देशोधडीला लागले आहेत. विशेषतः अथणी तालुक्यातील द्राक्षबागा सुकल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी कंगाल झाले आहेत.
होय, यावर्षी मोसमी पाऊस सुरु व्हायला नको तितका विलंब झाला आहे. त्यामुळे राज्यातही पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्याचप्रमाणे शेतातील उन्हाळी पिके वाया गेली आहेत तर दुसरीकडे पेरणीच्या तयारीत असलेल्या शेतकऱ्यांना जमिनीत पुरेशी ओल नसल्याने शेतीची सगळीच कामे खोळंबली आहेत. अथणी तालुक्यातील आडहळ्ळी गावातील गरीब कुटुंबानी द्राक्षबागांच्या भरवशावर आयुष्य घडविण्याचे स्वप्न पाहिले होते. मात्र पावसाअभावी त्यांच्या द्राक्षबागा सुकून गेल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले आहेत. कृष्णा नदीही कोरडी पडल्याने त्यांच्या चिंतेत भर पडली आहे.
आडहळ्ळी गावात एका शेतकऱ्याने चार वर्षांपूर्वी आपल्या दोन एकर शेतात द्राक्षाची लागवड केली होती, मात्र वरुणरायाच्या आगमनाला विलंब झाल्यामुळे द्राक्षाचे पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या राज्यातील शेतकऱ्यांची पिके हातची गेली आहेत. पाण्याचा थेंबही नसल्याने द्राक्षाचे संपूर्ण पीक उद्ध्वस्त झालेले पाहून अश्रूंनी हात धुवून घेण्याची वेळ बळीराजावर आली आहे. द्राक्ष पिकाचे चांगले उत्पन्न घेण्यासाठी शेतकऱ्यांनी कर्जबाजारी होऊन लागवड केली होती. मात्र पाऊसही नाही अन कृष्णा नदी कोरडी पडल्याने तालुक्यातील जनता चिंतेत आहे. सरकारने बळीराजाची ही बिकट अवस्था पाहून तातडीने मदतीला धावून यावे अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. बाईट.
Recent Comments