Belagavi

बेळगावात आषाढी एकादशी भक्तिपूर्ण वातावरणात

Share

बेळगाव शहर व जिल्ह्यात आज आषाढी एकादशी भक्तिपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यानिमित्त विविध विठ्ठल मंदिरात भाविकांनी विठूमाऊलीच्या दर्शनासाठी गर्दी केली होती.
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या विठुरायाची आषाढी एकादशी आज बेळगाव शहर, तालुका व जिल्ह्यात श्रद्धा-भक्तीने साजरी करण्यात आली. या निमित्त ठिकठिकाणच्या विठ्ठल मंदिरात अबालवृद्ध भाविकांनी लाडक्या विठूमाऊलीच्या दर्शनासाठी पहाटेपासून ते रात्री उशिरापर्यंत गर्दी केली होती. रांगेत उभे राहून शिस्तब्धतेने विठुरायाचे डोळेभरून दर्शन घेताना भाविकांच्या चेहऱ्यावर आगळेच समाधान व तृप्तीचे भाव दिसून आले.


बेळगावातील खडेबाजारातील खासगी विठ्ठल मंदिर आज आषाढी एकादशीनिमित्त भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले होते. या मंदिरात बेळगाव शहर व परिसरातील स्त्री-पुरुष भाविकांनी मोठी गर्दी केली होती. येथे महिला व पुरुष भाविकांसाठी स्वतंत्र दर्शन रांगेची व्यवस्था करण्यात आली होती. मंदिरात आकर्षक विद्युत रोषणाई केली होती. तसेच विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्तींची नयनरम्य सजावट करण्यात आली होती. गळ्यात तुळशीमाळा, पितांबरादि वस्त्रालंकार घालून मूर्ती सजविण्यात आल्या होत्या.


या मंदिरात पहाटे पाच वाजता विठूमाऊलीला अभिषेक करून विशेष पूजा करण्यात आली. दिवसभरात ५० हजारहून अधिक भाविकांनी दर्शन घेतल्याची माहिती पुजारी दत्तात्रेय यांनी दिली. बाईट.
याशिवाय खडेबाजारातील नामदेव दैवकी विठ्ठल मंदिर, शहापूर विठ्ठलदेव गल्लीतील विठ्ठल मंदिर, राजवाडा कंपाउंड, वडगाव येथील ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल मंदिर त्याचप्रमाणे अनगोळ, येळ्ळूर, राजहंसगड, धामणे, हिंडलगा, सुळगे, उचगाव, कंग्राळी आदी विविध विठ्ठल मंदिरात भाविकांनी विठूमाऊलीच्या दर्शनासाठी गर्दी केली. मंदिराबाहेर तुळस, फुले, श्रीफळ, उदबत्ती आदी पूजासाहित्याची दुकाने मांडण्यात आली होती.

Tags: