Belagavi

इ समीक्षा करण्याचा दबावाविरोधात अंगणवाडी शिक्षकांची निदर्शने

Share

कुटुंबातील सदस्यांची माहिती गोळा करण्यासाठी , आरोग्य विभागाकडून इ समीक्षा करण्याचा दबाव टाकण्यात येत आहे . ही पद्धती अत्यंत किचकट असून , खूप वेळ घेणारी आहे . त्यामुळे महिला आणि बालविकास खात्याने , पूर्वीप्रमाणे अर्जाची पद्धत अमलात आणावी अशी मागणी अंगणवाडी शिक्षिकांनी केली .

मंगळवारी , जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात जमलेल्या अंगणवाडी शिक्षिकांनी आपल्या मागणीच्या पूर्ततेसाठी जोरदार घोषणाबाजी केली .

अंगणवाडी शिक्षिकांचा संप आणि त्यांच्या समस्यांसंदर्भात संघटना अध्यक्ष अॅड. नागेश सातेरी यांनी अधिक माहिती देताना सांगितले कि , बाल विकास खात्याने अंगणवाडी शिक्षिकांना ई-समीक्षा पद्धत लागू केली आहे. ई-समीक्षा पद्धत म्हणजे अंगणवाडी शिक्षिकांनी घरोघरी जाऊन कुटुंबातील प्रत्येकाचे नांव, वय किती, बाळंतिणी किती आहेत, किती गर्भवती आहेत, किती मुले आहेत वगैरे संकलित केलेली माहिती मोबाईलमध्ये डाऊनलोड करून खात्याकडे पाठवावी लागते. मात्र समस्या ही आहे की सरकारने दिलेल्या मोबाईलची वॉरंटी संपली आहे.

 

याखेरीस तालुक्यात बऱ्याच ठिकाणी रेंज मिळत नाही. एका घरातील सदस्यांची माहिती घ्यायची झाल्यास किमान 40 मिनिटे लागतात. तेंव्हा हे व्यावहारिक दृष्ट्या अशक्य आहे. यात भर म्हणजे ई-समीक्षेसाठी मोबाईल कसा वापरावा? माहिती कशी डाउनलोड करावी? याचे प्रशिक्षण अंगणवाडी शिक्षकांना देण्यात आलेले नाही. तेंव्हा ई-समीक्षा पद्धत रद्द करून पूर्वीप्रमाणे अर्ज भरून देण्याची पद्धत लागू करावी, अशी आमची मागणी आहे. ई-समीक्षा बाबतीतील अंगणवाडी शिक्षिकांच्या समस्यसंदभात आम्ही महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांची भेट घेतली आहे. त्यांनी आमचे समस्या जाणून घेऊन या प्रकरणी स्वतः लक्ष घालण्याचे आश्वासन दिले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

कर्नाटक अंगणवाडी वर्कर्स अँड हेल्पर असोसिएशनच्या बेळगाव जिल्हा उपाध्यक्षा वाय बी . शिगेहळ्ळी यांनी ही इ समीक्षा करण्यास आमची काहींच हरकत नाही . महिला आणि बाल कल्याण खात्याने आम्हाला दिलेल्या मोबाईलची वॉरंटी संपत आली आहे . सरकारने आम्हाला सर्व्हेसाठी पूरक व्यवस्था करून द्यावी . आम्हाला फॉर्मेट तयार करून द्यावे . पण याला प्रतिसाद न देता आमच्यावर इ समीक्षेसाठी दबाव टाकण्यात येत आहे . आणि आम्हाला सेवेतून निलंबित करण्याची , पगार कट करण्याची धमकी पर्यवेक्षकांकडून दिली जात आहे

यावेळी अनिता कामाण्णाचे , भारती भोसले, सुजाता बेळगावकर, मीनाक्षी तोटगी आदींसह शहरासह जिल्ह्यातील अंगणवाडी शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Tags: