Belagavi

‘नाचता येईना, अंगण वाकडे’ अशी काँग्रेसची भूमिका : शशिकला जोल्ले

Share

अन्नभाग्य योजनेसाठी तांदूळ न दिल्याचा आरोप काँग्रेस सरकारने केंद्रातील मोदी सरकारवर करणे चुकीचे आहे. त्यांची ही भूमिका ‘नाचता येईना, अंगण वाकडे’ अशी आहे असा आरोप करत सरकारने माणशी १५ किलो तांदूळ द्यावा असे आव्हान माजी मंत्री शशिकला जोल्ले यांनी दिले.

मोदी सरकारच्या ९ वर्षांच्या कामगिरीचा लेखाजोखा मांडण्यासाठी बेळगावात माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या नेतृत्वाखाली बैठक पार पडली. या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांशी बोलताना माजी मंत्री शशिकला जोल्ले म्हणाल्या की, केंदातील मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार राज्यातील बीपीएल कुटुंबांना रक्षण कार्डवर प्रत्येकी ५ किलो तांदूळ देतच आहे. निवडणुकीपूर्वी काँग्रेसने प्रत्येकी दहा किलो तांदूळ देण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे त्यांनी आता प्रत्येकी १५ किलो तांदूळ देऊन आश्वासन पाळावे. उगाचच मोदींवर आरोप करण्यात अर्थ नाही असे त्यांनी ठणकावले.

मोदी सरकारच्या गेल्या ९ वर्षांतील कामगिरीची माहिती देण्यासाठी भाजप नेत्यांची ४ पथके राज्याचा दौरा करत आहे. त्यानुसार माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या नेतृत्वाखालील पथक आज बेळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. मोदींनी आणलेल्या स्वच्छ भारत, प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, आयुष्मान भारत, मुद्रा, उज्ज्वला गॅस आदी विविध जनकल्याणकारी योजनांची माहिती जनतेला देऊन जागृती करण्यात येणार आहे. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या फसव्या गॅरंटीना राज्यातील जनता भुलली आणि काँग्रेस सत्तेवर आली. त्या गॅरंटी आज मिळत नसल्याने जनता पश्चाताप करत आहे. लोकसभा निवडणुकीत असे होऊ नये यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. मोदींनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीमुळे देश आज सर्वोच्च स्थानावर आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत आम्ही मोदींना त्याची परतफेड करू असा विश्वास जोल्ले यांनी व्यक्त केला.

यावेळी चिक्कोडीचे खासदार अण्णासाहेब जोल्ले, विजापूरचे खासदार रमेश जिगजीनगी तसेच पक्षनेते उपस्थित होते.

Tags: