पाच वर्षे आमचेच सरकार आहे. आमच्या सरकारने वचन दिल्याप्रमाणे पाचपैकी काही योजनांचा लाभ देण्यास प्रारंभ केला आहे. सर्व योजना टप्प्याटप्प्याने सुरु करण्यात येतील असे सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी म्हटले आहे.
म्हैसूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले की, आता पुढील पाच वर्षे राज्यात आमचेच सरकार आहे. सर्व गॅरंटी आम्ही टप्प्याटप्प्याने निश्चित देऊ. नव्या योजना अंमलात आणताना काही तांत्रिक दोष, अडचणी येतात. त्यामुळे काही योजनांना विलंब झालाय. तांत्रिक दोष, अडचणी दूर करण्याचा प्रयत्न सरकार करतेय. सरकार सत्तेत येऊन आता कुठे एक महिना झालाय. पण पाचपैकी दोन-तीन योजना आम्ही सुरु केल्या आहेत. स्त्रीशक्ती महिला मोफत बसप्रवास योजना सुरु झाली आहे. गृहज्योतीसाठी नोंदणी सुरू आहे. एक जुलैला ती सुरु होईल. अन्नभाग्यसाठी केंद्र सरकार तांदूळ देत नसल्याने विलंब झाला आहे. त्यामुळे काही राज्यांशी तांदूळ पुरवण्यासाठी चर्चा सुरु आहे. काहीही झाले तरी टप्प्याटप्प्याने सर्व योजना आम्ही अमलात आणू असे ते म्हणाले. केंद्राचा 5 किलो + राज्याचा 10 किलो मिळून एकूण 15 किलो तांदूळ द्यावा या विरोधकांच्या मागणीवर किती तांदूळ द्यायचा हा सरकारचा अधिकार आहे, पण शब्द दिल्याप्रमाणे आम्ही तांदूळ पुरवू, विरोधक काय दिशाभूल करतातच अशी प्रतिक्रिया मंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिली.
सिद्दरामय्या पूर्ण पाच वर्षे मुख्यमंत्री राहणार का? या प्रश्नावर ते सर्व काही हायकमांडवर अवलंबून आहे असे मंत्री जारकीहोळी म्हणाले. एकंदर, जनतेला दिलेला शब्द आम्ही नक्की पाळू, असे मंत्री जारकीहोळी यांनी म्हटले आहे.


Recent Comments