Agriculture

राज्य रयत संघ, हसीरू सेनेच्या वतीने बेळगावात आंदोलन

Share

बेळगाव जिल्हा दुष्काळी जिल्हा घोषित करावा, प्रति एकरी 50 हजार रुपये पीक नुकसान भरपाई द्यावी आदी मागण्यांसाठी कर्नाटक राज्य रयत संघ आणि हसीरू सेनेच्या वतीने बेळगावात आंदोलन छेडण्यात आले. शुक्रवारी कर्नाटक राज्य रयत संघटना आणि हसिरू सेनेच्या कार्यकर्त्यांनी चन्नम्मा चौकात निदर्शने करून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून शेतकऱ्यांच्या विविध मागण्या पूर्ण करण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले. मान्सूनच्या पावसाअभावी आणि दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे जीवन संकटात आले आहे. पावसाअभावी उभी पिके शिवारातच वाळून जात आहेत. त्यामुळे पाणी टंचाई निवारणासाठी तातडीने उपाययोजना करावी, पीक नुकसानीपोटी एकरी 50 हजार रुपये नुकसानभरपाई मिळावी, असा शेतकऱ्यांनी आग्रह धरला.


यावेळी बोलताना राज्य रयत संघाचे अध्यक्ष चुन्नाप्पा पुजारी म्हणाले की, सरकार एका हाताने द्यायचे आणि दुसऱ्या हाताने काढून घ्यायचे असे धोरण शेतकऱ्यांच्याबाबतीत राबवत आहे. ते निषेधार्ह आहे. एकीकडे मोफत वीज देतो म्हणून सांगत दुसरीकडे वीजदरात प्रचंड वाढ करत आहे. पावसाअभावी राज्यभरात पिके वाळून चालली आहेत. पावसाअभावी कृषी व्यवसाय ठप्प होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे शेतकरी व त्यांचे कुटुंबीय रस्त्यावर येण्याची भीती आहे. बेळगाव जिल्ह्यातील सर्व धरणे कोरडी पडली आहेत. प्रत्येक गावात जनता व गुरांसाठी पिण्याच्या पाण्याची तत्काळ व्यवस्था करण्यात यावी. शेतकऱ्यांची कर्जवसुली पूर्णपणे थांबवावी. तसेच शेतकऱ्यांना कर्जमाफीची मागणी केली. ऊस उत्पादकांची थकबाकी तत्काळ द्यावी, साखर महामंडळात कर्मचाऱ्यांची कमतरता असून, तातडीने भरती करावी, अशी मागणी त्यांनी केली. या मागण्या पूर्ण न केल्यास शेतकरी आपला कुटुंबकबिला आणि जनावरांसह बेळगावात येऊन तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा त्यांनी दिला.
निदर्शनात चुनाप्पा पुजारी, सुरेश परगन्नवर, बसवराज बिचुरू, रमेश वाली, राघवेंद्र नायक आदी शेतकरी नेते उपस्थित होते

Tags: