Athani

उत्तर कर्नाटकावर दुष्काळाचे संकट गडद; शेतकरी-जनावरांना पाणी, चारा मिळणे दुरापास्त

Share

मॉन्सूनचा पाऊस लांबल्याने आधीच अवर्षणग्रस्त असलेल्या उत्तर कर्नाटकावर दुष्काळाचे संकट गडद झाले आहे. शेतकरी-जनावरांना पाणी, चारा मिळणे दुरापास्त झाले आहे. द्राक्ष, ऊस, केळी व इतर उन्हाळी पिके घेणारे अथणी तालुक्यातील बळ्ळीगेरी गावातील शेतकरी पिकांना पाण्याअभावी हतबल झाले आहेत.

होय, मॉन्सूनचा पाऊस लांबल्याने उत्तर कर्नाटकावर दुष्काळाची काळी छाया आणखी गडद झाली आहे. अथणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी सरकारने त्वरित त्यांच्या मदतीसाठी धावून येण्याची मागणी केली आहे. उन्हाळी पिके पाण्याअभावी वाळून गेल्याने पिकांना योग्य भरपाई देण्याची मागणी त्यांनी केली आहे. बळ्ळीगेरी गावातील 60 एकर विस्तीर्ण तलाव कोरडाठाक पडल्याने येत्या काही दिवसांत पाण्याचे आणखी मोठे दुर्भिक्ष्य निर्माण होण्याची भीती ग्रामस्थांना लागून राहिली आहे. त्यामुळे सीमावर्ती गावांमध्ये तलाव भरण्याचे प्रकल्प लवकरात लवकर राबवावेत, अशी विनंती शेतकरी व ग्रामस्थांनी केली आहे.


गायी-म्हशी, शेळ्या-मेंढ्यांना पिण्याचे पाणी मिळत नाही, गुरांच्या चाऱ्याचीही टंचाई निर्माण झाली आहे. वाळलेला ऊस तोडून उदरनिर्वाह करावा लागणार्‍या शेतकर्‍यांनी लाखो रुपये खर्चून शेततळे बांधले आहे. पण तेदेखील कोरडे पडल्याने पाण्याविना जगायचे कसे अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. कूपनलिका आणि विहिरीही कोरड्या पडल्याने निर्माण केलेला हा तलावदेखील आटल्याने परिस्थिती बिकट झाली आहे. हजार फुटांपर्यंत खोदाई करूनही कूपनलिकांना पाणी लागत नसल्याची गंभीर स्थिती आहे.


अथणी कागवाड तालुक्‍यातील सीमावर्ती गावे दुष्काळी भाग म्हणून जाहीर करून शेतकऱ्यांना अधिक मदत द्यावी, अशी विनंती बळ्ळीगेरी गावातील येथील शेतकऱ्यांनी केली आहे.
अथणी व कागवाडशी संबंधित अधिकारी व आमदारांनी येथील समस्यांकडे लक्ष देऊन लवकरात लवकर पीडित शेतकऱ्यांच्या मदतीला धावून जावे, अशी विनंती सीमावर्ती भागातील शेतकऱ्यांनी केली आहे.

Tags: