योग ही भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली अमूल्य देणगी आहे. योगपद्धतीचा अवलंब केल्याने अनेक शारीरिक व्याधी आणि मानसिक तणावातून मुक्ती मिळते. त्यामुळे सर्वांनी योगासनांचा सराव करून आरोग्यपूर्ण जीवन जगले पाहिजे असे आवाहन केएलई काहेर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन गंगणे यांनी केले.
बेळगावात बुधवारी केएलई संस्थेच्या सभागृहात नववा आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्त योगासनांची काहीकाळ प्रात्यक्षिके करण्यात आली. त्यावेळी योगसाधकांना संबोधित करताना डॉक्टर नितीन गंगणे म्हणाले, योग ही प्राचीन काळापासून चालत आलेली जीवन परिपूर्ण करणारी साधना आहे. योगाच्या नियमित सरावामुळे माणसाला आरोग्यपूर्ण जीवन जगण्यास मदत होते. त्यामुळे महागड्या जिममध्ये जाऊन पैसे वाया घालवण्यापेक्षा सहजसोपी योगासने करून शरीराला तंदुरुस्त ठेवता येते.
यावेळी उपस्थित योगसाधकांनी विविध योगासनांची प्रात्यक्षिके सादर केली. योगप्रशिक्षकांनी त्यांना मार्गदर्शन केले. योग प्रशिक्षक केशव कुलकर्णी आणि त्यांच्या विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. योगदिन कार्यक्रमात केएलई काहेर विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर व्ही ए कोठीवाले, केएलई संस्थेच्या बी एम कंकणवाडी आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य सुभाषकुमार शेट्टी यांच्यासह केएलई संस्थेच्या विविध शाखांचे प्रमुख, शिक्षक, विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
Recent Comments