Belagavi

जनतेच्या आशीर्वादांमुळे, मतांमुळे मी आमदार आणि मंत्री : मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर

Share

सामाजिक, राजकीय जीवनात कितीही उंची गाठली तरीही बेळगाव ग्रामीण मतदार संघातील जनतेच्या आशीर्वादांमुळे, मतांमुळे मी आमदार आणि मंत्री झालेय हे कधी विसरणार नाही. त्यासाठी तुमची चिरऋणी राहीन, मंत्री झाले म्हणून मतदारसंघाकडे मुळीच दुर्लक्ष करणार नाही अशी ग्वाही महिला व बालकल्याण, अपंग पुनर्वसन आणि ज्येष्ठ नागरिक सबलीकरण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली.

बेळगाव तालुक्यातील हलगा-बस्तवाड येथे काँग्रेस कार्यकर्ते आणि जनतेच्या वतीने लक्ष्मी हेब्बाळकर यांचा मंत्री झाल्याबद्दल रविवारी भव्य नागरी सत्कार करण्यात आला. त्यावेळी सत्काराला उत्तर देताना त्या बोलत होत्या. मंत्री हेब्बाळकर पुढे म्हणाल्या की, आज मी जी मंत्री, आमदार झाले, त्या प्रवासाचा पाय मतदारसंघातील जनतेने घातला आहे. बेळगाव ग्रामीण मतदारसंघाने मला राजकीय जन्म दिला. गेली 5 वर्षे मी मतदारसंघासाठी जमेल तेवढे काम केले. आता मंत्रिपद मिळाल्याने अधिकाधिक विकास प्रकल्प आणण्यास मदत झाली आहे. पक्षाचे नेते, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि तितक्याच महत्त्वाच्या ग्रामीण मतदारसंघातील जनतेमुळे मला हे स्थान मिळाले आहे. त्यामुळे तुमचे हे ऋण मी फेडू शकत नाही, असे त्यांनी भावुक होत सांगितले.

निवडणुकीपूर्वी दिलेली सर्व आश्वासने काँग्रेस सरकार हळूहळू पूर्ण करेल. याबाबत कुणालाही संभ्रम किंवा शंका नसावी. प्रकल्प सुरू झाल्यानंतर समस्या उद्भवू नयेत म्हणून प्रकल्पांना काही दिवस विलंब होत आहे इतकेच. त्याबद्दल गैरसमज नसावा, काँग्रेस कधीही आपला शब्द चुकवत नाही असे त्यांनी सांगितले.

काँग्रेस पक्षाच्या गृहलक्ष्मी, शक्ती, अन्नभाग्य आदी हमी योजना महिलांना सक्षमीकरणाकडे घेऊन जाणार आहेत. गृहलक्ष्मी माझ्या विभागाशी संबंधित असल्याने महिलांसाठी खूप फायदेशीर आहे. या योजनेद्वारे महिलांच्या चेहऱ्यावर आनंद आणण्याचे भाग्य मला लाभले याचा खूप अभिमान वाटतो असे त्यांनी सांगितले.


येत्या काळात या ग्रामीण मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि लोककल्याणासाठी लोकांचे सहकार्य आवश्यक आहे. आठवड्यातील शुक्रवार ते रविवार असे तीन दिवस मतदारसंघात राहून जनतेची सेवा करेन असे लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले. बाईट.
विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी म्हणाले की, ग्रामीण भागातील जनता आणि आपण सर्व जण एका कुटुंबासारखे आहोत. आपण सर्वांनी मिळून क्षेत्राचा सर्वांगीण विकास करूया. भगिनी लक्ष्मी हेब्बाळकर मंत्री असल्या तरी मतदारसंघाकडे दुर्लक्ष करत नाहीत. या मतदारसंघाच्या विकासासाठी आम्ही सदैव कटिबद्ध राहू, असे ते म्हणाले

यावेळी ग्रामस्थ व काँग्रेस कार्यकर्त्यांनी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचा सत्कार केला. कार्यक्रमाला बागेवाडी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष सी सी पाटील, सुरेश इटगी, बांडगी, शिवराज जाधव यांच्यासह स्थानिक नेते व महिलांची उपस्थिती होती.

Tags: