Belagavi

कणबर्गी मुख्य रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करा : आ. राजू सेठ

Share

कणबर्गी मुख्य रस्त्याचे गेल्या सहा महिन्यांपासून बंद पडलेल्या कामाची आ. राजू सेठ यांनी गंभीर दखल घेत अधिकारी आणि ठेकेदाराला चांगलेच फैलावर घेतले. बंद पडलेले काम तातडीने उद्यापासून सुरु करून दर्जेदार पद्धतीने लवकर पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

बेळगावचे उपनगर असलेल्या कणबर्गी गावच्या प्रवेशद्वारापासून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा व त्यापुढील मुख्य रस्त्याचे काम सहा महिन्यांपूर्वी सुरु करण्यात आले होते. मात्र ते मध्येच अचानक बंद ठेवण्यात आले. त्यामुळे रहिवाशांना, वाहनचालकांना नाहक त्रास सोसावा लागत आहे. महिन्यापूर्वी झालेल्या वळवाच्या पावसात तर चिखल, दलदल निर्माण होऊन अनेक वाहनचालक व पादचारी पडून गंभीर जखमी झाले होते. त्यामुळे या रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करण्याची मागणी नागरिकांनी केली होती. आज आमदार राजू सेठ यांनी या भागाला भेट देऊन पाहणी करून नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या.

त्यानंतर त्यांनी संबंधित अधिकारी आणि ठेकेदाराला बोलावून काम प्रलंबित ठेवल्याबद्दल जाब विचारला. आमदार सेठ यांनी अधिकारी आणि ठेकेदाराला यावेळी चांगलेच फैलावर घेतले. ‘आपण लोकांसाठी आहोत, लोकांना त्रास होणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे. तुम्ही इतके बेजबाबदार कसे काय वागता? असा सवाल करत त्यांना धारेवर धरले. हे काम तातडीने उद्यापासूनच करा, उद्या सकाळीच यंत्रसामुग्री आणा, होत नसेल तर सांगा, आम्ही पर्यायी व्यवस्था करू असेही त्यांनी सुनावले.

दरम्यान, इन न्यूजशी बोलताना आमदार राजू सेठ यांनी, कणबर्गी मुख्य रस्त्याचे काम उद्यापासूनच सुरु करण्यात येईल. रस्ता चांगला दर्जाचा झाला पाहिजे अशा सूचना अधिकारी आणि ठेकेदाराला दिल्या आहेत. लवकरात लवकर हे काम पूर्ण करून नागरिकांना दिलासा देऊ असे त्यांनी सांगितले.


यावेळी स्थानिक नगरसेविका अस्मिता पाटील तसेच मनपा, स्मार्टसिटी अधिकारी आणि स्थानिक रहिवाशी उपस्थित होते.

Tags: