राज्यातील कोणीही गरीब उपाशी झोपू नये म्हणून काँग्रेस सरकारने अन्नभाग्य योजना आणली. मात्र केंद्र सरकार त्यासाठी तांदूळ न देण्याचे राजकारण करत खोडा आणत आहे. त्यामुळे केंद्रातील भाजप सरकारच्या निषेधार्थ राज्यभरात येत्या मंगळवारी, 20 जूनला आंदोलन छेडण्यात येईल अशी माहिती उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी दिली.
बेंगळूरमधील केपीसीसी कार्यालयात आज पत्रकार परिषदेत बोलताना उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार म्हणाले की, निवडणुकीपूर्वी दिलेल्या सर्व 5 गॅरंटी पूर्ण करण्यास आमचे सरकार वचनबद्ध आहे. विरोधकांनी कितीही टीकाटिप्पणी केली तरी आम्ही त्याला दाद देणार नाही. म्हणूनच आम्ही पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत सर्व गॅरंटी लागू करण्याचा निर्णय घेऊन आदेश जारी केला. येत्या जुलैपासून अन्नभाग्य योजना जारी करण्याची घोषणा केली. त्याआधी फूड कार्पोरेशन ऑफ इंडियासोबत चर्चा केली. एफसीआयने 12 जूनला त्यासाठीचा तांदूळ पुरवण्याचे आश्वासनही दिले.
मात्र दुसऱ्याच दिवशी 13 जूनला केंद्र सरकारने ओपन मार्केट सिस्टीम लागू केल्याचे सांगत अन्नभाग्यसाठी लागणार तांदूळ देण्यास नकार दिला. आम्ही एफसीआयकडे फुकट तांदूळ मागितला नव्हता. सध्याच्या 34 रूपे प्रतिकिलो दराने आम्ही तांदूळ खरेदी करणार होतो. एफसीआयच्या बेंगळूर विभागाने राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून सात दिवसांत तांदूळ घेऊन जाण्याची सूचनाही दिली होती. परंतु ऐनवेळी केंद्र सरकारने तांदूळ व गहू खुल्या बाजारात विकण्याचा निर्णय घेऊन राज्यातील गरिबांच्या पोटावर पाय आणला आहे असा आरोप शिवकुमार यांनी केला. केंद्राने तांदूळ दिला नाही तरी अन्य राज्यांकडून मागवून अन्नभाग्य योजना राबवणारच असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे भाजप हा द्वेषाचे राजकारण करणारा, गरिबीविरोधी पक्ष असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. भाजपच्या या धोरणाचा आम्ही निषेध करतो. या निर्णयाच्या विरोधात येत्या मंगळवारी 20 जूनला राज्यातील सर्व जिल्हा केंद्रांवर भाजप नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या निषेधार्थ भव्य आंदोलन करण्यात येईल. तशा सूचना जिल्हा काँग्रेस समित्यांना देण्यात येतील. कर्नाटकाच्या प्रति भाजप सरकारचा सापत्नभाव जनतेच्या निदर्शनास आणून देण्यासाठी हे आंदोलन छेडण्यात येणार आहे असे त्यांनी सांगितले.
राज्य सरकारच्या गॅरंटी योजनांवर भाजप नेत्यांकडून होत असलेल्या टीकेबाबतच्या प्रश्नावर, आमच्या योजना अपयशी व्हाव्यात यासाठी भाजप नेते देव पाण्यात घालून बसले आहेत. आम्ही आश्वासनांची पूर्तता कशी करतो याची चिंता भाजप नेत्यांनी करायची गरज नाही. त्यांनी काळा पैसे देशात आणणे, प्रत्येक नागरिकांच्या खात्यात 15 लाख रुपये जमा करणे अशा मोदींनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता कशी, कशी होते याची चिंता करावी, त्यावर बोलावे असा चिंता शिवकुमार यांनी काढला. पक्षाचे नेते एआयसीसी अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या सूचनेनुसार 21 जूनला दिल्लीत त्यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले
पत्रकार परिषदेला काँग्रेस कार्याध्यक्ष सलीम अहमद व अन्य काँग्रेस नेते उपस्थित होते.


Recent Comments