Belagavi

‘त्या’ विधानाबद्दल शामनूर शिवशंकरप्पा यांनी माफी मागावी : बसवराज रोट्टी

Share

वीरशैव लिंगायत महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष शामनूर शिवशंकरप्पा यांनी जागतिक लिंगायत महासभा आणि तिचे प्रधान मुख्य सचिव डॉ. शिवानंद जामदार यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य केले आहे. ‘त्या’ विधानाबद्दल त्यांनी विनाशर्त माफी मागावी अशी मागणी जागतिक लिंगायत महासभेचे जिल्हाध्यक्ष बसवराज रोट्टी यांनी केली.

बेळगावात शुक्रवारी पत्रकार परिषदेत बोलताना बसवराज रोट्टी म्हणाले की, वीरशैव लिंगायत महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष शामनूर शिवशंकरप्पा यांनी जागतिक लिंगायत महासभा आणि तिचे प्रधान मुख्य सचिव डॉ. शिवानंद जामदार यांच्याविषयी नुकतेच अवमानकारक वक्तव्य केले आहे. ते राज्यातील अनेक प्रमुख वृत्तपत्रात, प्रसारमाध्यमांत प्रसिद्ध झाले आहे. त्यांचे हे वक्तव्य निषेधार्ह आहे. जागतिक लिंगायत महासभा कुठे आहे? तिथे फक्त मुख्य सचिव डॉक्टर शिवानंद जामदार आहेत. त्यांना वेड्यांच्या इस्पितळात दाखल करण्याची गरज आहे. कोण नेलं नाही तर आम्हीच त्यांना वेड्यांच्या इस्पितळात दाखल करू असे वक्तव्य शामनूर शिवशंकरप्पा यांनी केले आहे. त्याबद्दल त्यांनी विनाशर्त माफी मागावी आणि वक्तव्य मागे घ्यावे अशी मागणी रोट्टी यांनी केली.

जागतिक लिंगायत महासभा ही राज्यातील लिंगायत समाजाच्या मठाधीशांनी स्थापन केलेली लिंगायत समाजाची शिखर संस्था आहे. राज्यभरात तिचे 25 हजारहून अधिक सक्रिय सदस्य आहेत. केवळ कर्नाटकातच नव्हे तर महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, तेलंगणा आणि गोव्यातही महासभेचे सदस्य आहेत. एवढेच नव्हे तर परदेशातही महासभेचे सदस्य आहेत. लिंगायत धर्माला स्वतंत्र धर्माची मान्यता मिळावी यासाठी महासभा प्रयत्नशील आहे. या सगळ्या गोष्टींची शामनूर शिवशंकरप्पा यांना माहिती असायला हवी. बसवकल्याण येथे नुकतेच जागतिक लिंगायत महासभेचे राष्ट्रीय अधिवेशन यशस्वीरीत्या पार पडले. त्यात अडीजशेहून अधिक लिंगायत स्वामीजींनी भाग घेतला होता. त्याचे नेतृत्व महासभेचे प्रधान सरचिटणीस डॉक्टर शिवानंद जामदार यांनी केले होते. जामदार हे लिंगायत महासभा आणि लिंगायत समाजाच्या कल्याणासाठी झटणारे आमचे नेते आहेत. त्यांनी आयएएस अधिकारी म्हणून राज्यात व देशात विविध पदांवर प्रामाणिक, कर्तव्यनिष्ठ अधिकारी म्हणून नावलौकिक मिळवला आहे. शामनूर शिवशंकरप्पा ज्येष्ठ आदरणीय नेते आहेत. परंतु त्यांनी लिंगायत महासभा आणि डॉक्टर जामदार यांच्यावर केलेली टीका त्यांची हताश मनोवृत्ती उघड करते अशी टीका बसवराज रोट्टी यांनी केली. शामनूर शिवशंकरप्पा यांनी आपले विधान मागे घेऊन विनाशर्त माफी मागावी अन्यथा लिंगायत महासभेच्या कार्यकारिणीत चर्चा करून त्यांच्या निषेधार्थ आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला.

पत्रकार परिषदेला लिंगायत महासभेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Tags: