Belagavi

बेळगावात शनिवारी निःशुल्क “रोटरी मेगा जॉब फेअर-2023”

Share

बेळगाव जिल्ह्यातील बेरोजगार युवक-युवतींना रोजगार मिळवून देण्याच्या हेतूने रोटरी क्लब ऑफ वेणुग्रामने बेळगावात येत्या शनिवारी भव्य निःशुल्क “रोटरी मेगा जॉब फेअर-2023″चे आयोजन केले आहे.

बेळगावात बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत क्लबचे माजी अध्यक्ष डी बी पाटील, विद्यमान अध्यक्ष उमेश रामगुरवाडी यांनी ही माहिती देऊन सांगितले की, बेळगाव शहर, तालुका आणि जिल्ह्यातील बेरोजगार युवक-युवतींसाठी रोटरी क्लब ऑफ वेणुग्रामतर्फे सामाजिक कर्तव्य म्हणून प्रथमच बेळगावात भव्य प्रमाणात रोजगार मेळावा घेण्यात येत आहे. येत्या शनिवारी 17 जून रोजी सकाळी 9 ते दुपारी 1 या वेळेत क्लब रोडवरील ज्योती कॉलेजच्या सभागृहात हा मेळावा होईल. या मेळाव्यात पुणे, बेंगळूर आणि बेळगाव परिसरातील स्थानिक अशा 40हुन अधिक कंपन्या भाग घेऊन उमेदवारांची निवड करणार आहेत. बेळगाव जिल्ह्यातून सुमारे 4 हजार रोजगार इच्छुक युवक-युवती मेळाव्याला उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे. एरव्ही उच्चशिक्षितांसाठीच रोजगार मेळावे घेतले जातात. पण आम्ही प्रथमच दहावी, बारावीपासून ते उच्चशिक्षितांसाठी या रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. सकाळी 9 पूर्वी रोजगार इच्छुकांनी नावनोंदणी करणे आवश्यक आहे. मेळावा पूर्णपणे निःशुल्क असून उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही असे डी बी पाटील यांनी स्पष्ट केले.


रोटरी क्लब ऑफ वेणुग्रामने बेंगळूरच्या स्पेक्ट्रम टॅलेंट मॅनेजमेंट लिमिटेड या कंपनीच्या सहकार्याने व दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या बी के व ज्योती कॉलेजच्या सहयोगाने हा रोजगार मेळावा आयोजित केला आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली. पत्रकार परिषदेला रोटरी क्लबचे इव्हेंट चेअरमन शिवानंद पाटील, सचिव विजयकुमार पाटील, स्पेक्ट्रमचे समन्वयक विजयकुमार के आदी उपस्थित होते.

Tags: