Belagavi

रामनगर वड्डरवाडी रहिवाशांची हेस्कॉम कार्यालयासमोर निदर्शने

Share

आम्ही गोरगरिब, हातावरच्या पोटाचे लोक, घरात एक-दोन बल्ब वापरतो, आम्हाला दोन-तीन हजार रुपये लाईटबील आल्यावर आम्ही कसे भरायचे? बिल भरून उपाशी रहायचे का असा संताप व्यक्त करत रामनगर वड्डरवाडी भागातील रहिवाशांनी हेस्कॉम अधिकाऱ्यांना जाब विचारला.

 

होय, कष्टकऱ्यांची, कुली कामगारांची वस्ती असलेल्या बेळगावातील रामनगर भागातील रहिवाशांना हेस्कॉमने पाठविलेल्या वीजबिलामुळे मोठा शॉक बसला आहे. गवंडी, कुली असे काम करणाऱ्या या कष्टकऱ्यांवर हेस्कॉमचे भरमसाठ लाईटबील पाहून डोळे पांढरे होण्याची वेळ आली आहे. त्यामुळे त्यांनी आज एकत्र येत हेस्कॉमच्या सहाय्यक कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयात येऊन अधिकाऱ्यांना जाब विचारला. कार्यालयासमोर घोषणा देत निदर्शने केली.

हेस्कॉमच्या कार्यालयात निवेदन देऊन बिलांबाबत विचारणा करण्यास आलेल्या रहिवाशांना अधिकारी जागेवर नसल्यामुळे ताटकळत बसावे लागले. कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. त्यावर संतप्त नागरिकांनी, हेस्कॉमने भरमसाठ वीजबिल आकारून आम्हाला उपाशी ठेवायचे ठरवले आहे का असा संपत सवाल केला.

यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना रहिवासी हनुमंत कागलकर यांनी सांगितलं की, रामनगर वड्डरवाडी ही वसाहत गोरगरीब, कष्टकऱ्यांची वस्ती आहे. छोट्या-छोट्या घरात एखाद दुसरा लाईट लावून आम्ही जगतो. आमचे एरव्हीचे बिल 200 ते 300 रुपयांपर्यंत येत होते. पण या महिन्यात आम्हाला दोन ते तीनपट अधिक बिल पाठवून देण्यात आले आहे. ते भरणे आम्हाला अशक्य आहे. सरकारने तातडीने वाढीव वीजबिले मागे घेऊन पूर्वीच्या दरानेच वीजबिल अकरावे अशी मागणी त्यांनी केली.

या निदर्शनात रामनगर वड्डरवाडी भागातील रहिवाशानी मोठ्या संख्येने भाग घेतला.

Tags: