स्त्री शक्ती योजनेमुळे परिवहन मंडळे नफ्यात येतील असा आशावाद सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी व्यक्त केला. वाढीव वीजबिले कोणत्या आधारावर देण्यात येत आहेत याची माहिती घेऊन त्यावर बोलेन असे स्पष्टीकरणही त्यांनी यावेळी दिले.
बेळगावात आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रसारमाध्यमांशी बोलताना मंत्री सतीश जारकीहोळी म्हणाले की, स्त्रीशक्ती योजनेमुळे राज्यातील महिलांना मोफत बसप्रवासाची सुविधा उपलब्ध झाली आहे. योजनेचे नियोजन व्यवस्थित झाले आहे. या योजनेमुळे राज्यातील परिवहन मंडळे नफ्यात येतील असा विश्वास वाटतो. तसे झाल्यास परिवहन मंडळांची स्थिती सुधारेल, कर्मचाऱ्यांचे वेतनही वाढविता येईल असे ते म्हणाले.
राज्यात वीजपुरवठा मंडळांकडून वाढीव वीजबिले देण्यात येत असल्याच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया देताना, कोणत्या आधारावर दुप्पट-तिप्पट बिले देण्यात येत आहेत याची नेमकी माहिती आपल्याला नाही. ती घेऊन यावर काय ते बोलेन असे मंत्री जारकीहोळी यांनी सांगितले. वीज दरवाढ ही नियमित प्रक्रिया आहे. वीज नियामक आयोगाने दरवाढीला एप्रिलमध्ये परवानगी दिल्याची माहिती आहे. कदाचित निवडणुकीमुळे दरवाढ लगेच अमलात आणली गेली नसावी. विजेची समस्या केवळ कर्नाटकातच नव्हे तर संपूर्ण देशातच आहे. दरवाढीची समस्या तात्पुरती आहे. ती निकाली निघेल. त्यामुळे बेळगाव भागातील, कर्नाटकातील उद्योग महाराष्ट्रात स्थलांतरित होतील ही शक्यता त्यांनी फेटाळून लावली. पावसाला विलंब झाल्याने बेळगावात आणि उत्तर कर्नाटकात पाणीसमस्या तीव्र होत आहे या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राकडे आणखी पाणी मागणार का या प्रश्नावर, तशी वेळ आता येणार नाही असे वाटते. कारण येत्या आठवड्याभरात पावसाला सुरवात होण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर ही समस्या राहणार नाही असे मंत्री जारकीहोळी यांनी सांगितले.
यावेळी जिल्हाधिकारी नितेश पाटील, शहर पोलीस आयुक्त बोरलिंगय्या आदी उपस्थित होते.


Recent Comments