Belagavi

जायंट्सतर्फे नेत्रदान जनजागृती फेरीचे आयोजन

Share

बेळगाव: नेत्रदानाची चळवळ ही सगळीकडे रुजली पाहिजे त्यासाठी आपण स्वतःपासून याची सुरुवात करावी असे प्रतिपादन बालिका आदर्श विद्यामंदिरचे मुख्याध्यापक एन ओ डोणकरी यांनी केले.

जायंट्स आय फौंडेशन आणि जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेनच्या वतीने जागतिक नेत्रदानानिमित्त आयोजित जनजागृती फेरीच्या उदघाटन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि स्वागत सचिव लक्ष्मण शिंदे यांनी केले तर
नेत्रदानाचे महत्व लक्षात घेऊन दरवर्षी १० जून हा दिन “जागतिक दृष्टिदान दिन” म्हणून साजरा करण्यात येतो. या माध्यमातून लोकांमध्ये नेत्रदानाची जनजागृती केली जाते. सुप्रसिद्ध नेत्रविशारद डॉ. आर. ए. भालचंद्र यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ १० जून हा दिन ‘दृष्टिदान दिन’ म्हणून साजरा केला जातो अशी माहिती जायंट्स आय फौंडेशनचे अध्यक्ष शिवराज पाटील यांनी दिली.

 

जागतिक दृष्टीदान दिनाचं सर्वात महत्त्वाचे उद्दिष्ट म्हणजेच लोकांना नेत्रदानाचं महत्त्व पटवून देणे आणि नेत्रदानाविषयी जनजागृती करून लोकांना मृत्यूनंतर डोळे दान करण्याची प्रतिज्ञा घेण्यास प्रवृत्त करणे असा आहे. भारतासह अनेक देशांमध्ये आजही अंधत्व ही मुख्य समस्या आहे असे आय फौंडेशनचे संस्थापक मदन बामणे यांनी सांगितले.
जायंट्स मेनचे अध्यक्ष सुनिल मुतगेकर यांनी उपस्थित विद्यार्थिनींना उद्देशून बोलताना प्रत्येकीने आपापल्या घरी जाऊन शेजाऱ्यांना पै पाहुण्यांना नेत्रदानाविषयी माहिती द्यावी असे सांगितले.

यावेळी शिवराज पाटील यांच्या हस्ते मुख्या.डोणकरी यांचा रोपटे देऊन सन्मान करण्यात आला.
त्यानंतर नेत्रदान जनजागृती फेरीची सुरुवात झाली, ही फेरी बुधवार पेठ मंगळवारपेठ खानापूर रोड,आरपीडी सर्कल,देशमुख रोड, गुरुवार पेठ या मार्गावरून परत बालिका आदर्श शाळेकडे सांगता झाली.

फेरीच्या अग्रभागी विद्यार्थिनींचे ढोल पथक होते. त्यांच्या पाठीमागे विद्यार्थिनी हातात जनजागृतीचे फलक धरून घोषणा देत सहभागी झाल्या होत्या. नेत्रदान महादान, द्या अंधाना दृष्टी तेही पाहतील सुंदर सृष्टी अशा घोषणानी टिळकवाडी परिसर दणाणून सोडला. एरव्ही शांत असणाऱ्या टिळकवाडी परिसरातील नागरिक घराबाहेर येऊन तसेच गॅलरीत थांबून या फेरीकडे पहात होते.
फेरीची सांगता झाल्यानंतर सहभागी विद्यार्थिनींना लस्सीचे वाटप करण्यात आले.


या फेरीमध्ये विद्यार्थिनींसोबत शाळेचे शिक्षक शिक्षिका, जायंट्स मेनचे उपाध्यक्ष अविनाश पाटील, खजिनदार विजय बनसूर, माजी अध्यक्ष शिवकुमार हिरेमठ,अनंत लाड,अशोक हलगेकर, विश्वास पवार,सुरेश पिसे, आनंद कुलकर्णी, सुनिल मुरकुटे, दिगंबर किल्लेकर,गावडू पाटील,भरत गावडे, महेश रेडेकर,पद्मप्रसाद हुली व इतर सदस्यांनी सहभाग नोंदवला.

Tags: