Belagavi

16 ते 22 जूनपर्यंत गोव्यात ‘विश्व हिंदु राष्ट्र महोत्सव’ : सुनील घनवट

Share

हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्याला गती देण्यासाठी हिंदु जनजागृती समितीतर्फे 16 ते 22 जूनपर्यंत गोव्यात ‘विश्व हिंदु राष्ट्र महोत्सव’ आयोजित केल्याची माहिती महाराष्ट्र मंदिर महासंघ व हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगडचे समन्वयक सुनील घनवट यांनी दिली.

बेळगावात आज पत्रकार परिषदेत बोलताना सुनील घनवट म्हणाले की, गोवा येथे गेल्या 11 वर्षापासून होणाऱ्या ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनामुळे हिंदु राष्ट्राची चर्चा आता केवळ भारतातच नाही, तर वैश्विक पातळीवर प्रारंभ झाली आहे. यामध्ये आता हिंदु राष्ट्राची मागणी करणारी अनेक व्यासपिठे निर्माण झाली आहेत; मात्र दुसरीकडे देशात इस्लामिक स्टेटच्या समर्थकांना मोठ्या प्रमाणात अटक होत आहे. पंजाबमध्ये खलिस्तानवादी पोलीस प्रशासनाला आव्हान देत आहेत, हिंदू कार्यकर्त्याच्या हत्या करत आहेत, तर मणिपूर, नागालँड यांसारख्या राज्यांतील हिंदूंची घरे जाळत आहेत. काश्मीरमधून कलम 370 हटवले गेले, तरी तेथील हिंदू सुरक्षित झालेला नाही. देशभरात साक्षी, अनुराधा, श्रद्धा वालकर यांसारख्या असंख्य हिंदू मुलींच्या ‘लव्ह जिहादी कडून होणाऱ्या निर्घृण हत्या पाहता देशातील परिस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे, असे दिसते. ‘दी केरला स्टोरी’ या चित्रपटाने मांडलेले वास्तव केवळ केरळ राज्यापुरते मर्यादित नसून या जिहादी षड्यंत्राची व्याप्ती देशभरात मोठ्या प्रमाणात उघडकीस येत आहे. एकीकडे हिंदूंनी भाषण केले की, लगेचच त्यांच्यावर ‘हेट स्पीच’चा गुन्हा दाखल केला जातो; मात्र ‘सर तन से जुदा’ करण्याच्या उघड घोषणा देणाऱ्यांवर कारवाई होतांना दिसत नाही. दुसरीकडे राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या तपासात ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ आणि इसिस हे भारताला वर्ष 2047 पर्यंत इस्लामीक राष्ट्र बनवण्याचे षड्यंत्र रचत असल्याचे उघड झाले आहे. अशा स्थितीत हिंदु धर्म हा एकमात्र धर्म आहे की, जो समाजाला जोडू शकतो, तो विश्वबंधुत्वाची आणि ‘वसुधैव कुटुंबकम’ची संकल्पना मांडू शकतो. त्यामुळे भारताचे पुन्हा तुकडे होऊ द्यायचे नसतील, तर भारताला आदर्श रामराज्य अर्थात् हिंदु राष्ट्र बनवण्याशिवाय पर्याय नाही, म्हणूनच हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्याला गती देण्यासाठी प्रतीवर्षीप्रमाणे 16 ते 22 जून 2023 या कालावधीत ‘श्री रामनाथ देवस्थान, फौडा, गोवा येथे एकादश ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र ‘अधिवेशन’ अर्थात् ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ आयोजित केला आहे, असे सुनील घनवट यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेस हमारा देश संघटनेचे व्यंकटेश शिंदे, हिंदु जनजागृती समितीचे उत्तर कन्नड समन्वयक शरतकुमार नाईक, उज्वला गावडे आदी उपस्थित होते.

Tags: