मद्यधुंद अवस्थेत एका शिक्षकाने चक्क शाळेतच ताणून दिल्याची घटना बेळगावातील एका शाळेत घडली आहे. या शिक्षकाची तक्रार घेण्यास पोलिसांनी आणि शिक्षणाधिकाऱ्यांनी टाळाटाळ केल्याने पालकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटली आहे.

होय, स्वतः चांगले वागून विध्यार्थ्यांना चांगल्या वागणुकीचे संस्कार देणे अपेक्षित असलेला शिक्षक चक्क दारूच्या नशेत शाळेतच झोपल्याची संतापजनक घटना बेळगावात घडली आहे. शहरातील धर्मवीर संभाजी महाराज उद्यानाशेजारील संभाजी गल्ली सरकारी मराठी शाळा क्र. 12मध्ये हा प्रकार घडला आहे. या शाळेतील कन्नड विषयाच्या शिक्षकाने प्रमाणाबाहेर दारू ढोसली आणि तो तारवटलेल्या अवस्थेतच शाळेत आला. मात्र अतिमद्यप्राशनाने त्याला धड चालता किंवा उभेही राहता येत नव्हते. त्यामुळे काही वेळातच तो विध्यार्थ्यांसमोरच झोपी गेला. सकाळी मुलांना सोडण्यासाठी शाळेत आलेल्या पालकांना या प्रकाराची माहिती मिळताच त्यांनी त्या शिक्षकाला जाब विचारला. त्यावेळी त्याला पालकांशी नीट बोलताही येत नव्हते. जड जिभेने आपण दारू प्यालीच नाही असा दावा तो करू लागला. मात्र तुमच्या तोंडातून दारूची वास येतेय असे सांगून पालकांनी त्याला धारेवर धरले. त्यावेळी तो गयावया करू लागला.
काही झाले तरी हा शिक्षक आपण दारू प्यालीच नाही असे सांगत राहिला. त्यामुळे पालकांनी विध्यार्थ्यांना बोलावून विचारले असता एका छोट्या विद्यार्थिनीने शिक्षकाने दारू प्याल्याचे सांगून त्याच्या तोंडाला घाण वास येत असल्याचे सांगितले.

या संदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना नागेश पाटील आणि अन एका पालकाने सांगितले की, आम्ही आज सकाळी मुलांना शाळेत सोडण्यासाठी आलो असताना या शाळेतील कन्नड विषयाचा शिक्षक मद्यधुंद अवस्थेत शाळेत आल्याचे दिसून आले. यापूर्वीही 10-15 वेळा तो दारू पिऊन शाळेत आला होता, त्यामुळे त्याला शिक्षा देण्यात आली होती असे समजते. पण त्यानंतरही त्याच्या वर्तनात सुधारणा झालेली नाही आणि आज पुन्हा तो दारू पिऊन शाळेत येऊन विध्यार्थ्यांसमोरच झोपला. आम्ही याबाबत शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार केली असता, त्यांनी तुम्हीच त्याचा व्हिडिओ काढून पोलिसांकडे जाण्याचा सल्ला देऊन जबाबदारी झटकली. मार्केट सीपीआयकडे आम्ही गेलो असता, त्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांकडून तक्रार आली तर कारवाई करू असे सांगून त्यांनीही जबाबदारी झटकली. त्यामुळे आम्ही नेमकी कोणाकडे तक्रार करायची असा संभ्रम निर्माण झाला आहे. सरकार शाळा-कॉलेजपासून किमान 100 मीटर परिसरात तंबाखू, गुटखा, तंबाखूजन्य पदार्थांची दुकाने असे सांगते. पण असे मद्यपी शिक्षक नेमते, अशा शिक्षकांकडून मुलांवर काय संस्कार होणार? असा सवाल करून सरकारने त्यांना आधी बाहेर काढावे अशी मागणी केली.

पालकांनी या शिक्षकाला जाब विचारत असताना चूक झाली असे समजा, माफ करा असे सांगत संबंधित शिक्षक गयावया करत होता. कधी शाळेच्या आवारातील कट्यावर बसून विनवणी करत होता. पालकांनी त्याचा पिच्छा पुरवल्यावर त्याने चक्क शाळेच्या आवारातून पळ काढला.
एकंदर, कोवळ्या विद्यार्थ्यांवर सुसंस्कार करण्याची अपेक्षा ज्या शिक्षकांकडून असते त्यांनीच मद्यधुंद अवस्थेत शाळेत येऊन असा धिंगाणा घातल्यास विद्यार्थ्यांवर काय संस्कार होणार असा संतप्त सवाल पालकांनी केला आहे. आता शिक्षण खाते यावर काही कारवाई करणार का शिक्षकाच्या या असभ्य, नियमबाह्य वर्तनावर पांघरून घालणार हे पाहणे कुतूहलाचे ठरणार आहे.


Recent Comments