Belagavi

वीज दरवाढीच्या निषेधार्थ बेळगावात विणकर संघटनेची जोरदार निदर्शने

Share

राज्य सरकारने वीजदरात वाढ केल्याने बेळगाव जिल्ह्यातील वीजमाग विणकर अडचणीत आले आहेत. सरकारने वीज बिल कमी करावे, या मागणीसाठी बेळगावात विणकर सेवा संघाच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन छेडण्यात आले.

गृहज्योती योजनेंतर्गत वीज मोफत असल्याचे राज्य सरकार सांगत आहे तर दुसरीकडे विजेचे दर अव्वाच्या सव्वा वाढवले आहेत. त्यामुळे विणकर आर्थिक संकटात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर आज विणकर संघटनेच्या वतीने चन्नम्मा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निदर्शने करण्यात आली. यावेळी विणकर संघटनेच्या नेत्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून राज्यातील व्यावसायिक विणकरांच्या हक्कासाठी मुख्यमंत्र्यांनी विणकरांच्या शिष्टमंडळासह चर्चेला परवानगी द्यावी या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
याबाबत इन न्यूजसोबत बोलताना नेकार सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष शिवलिंग जी टिरकी यांनी सांगितले की, राज्यभरात वीजबिल वाढल्याने विणकर आर्थिक संकटात सापडले आहेत. निवडणुकीदरम्यान 10 एचपीपर्यंत मोफत वीज देण्याचे आश्वासन दिले होते, मात्र अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. राज्यातील सर्व विणकरांना 10 रुपये 25 पैसे अनुदान युनिट दरात 2.50 पैशांनी वाढ झाली आहे. एप्रिलपासून किमान रक्कम 90 रुपयांवरून 140 रुपये झाली आहे. त्यामुळे वाढीव वीजबिल देत आहेत. विणकरांना हे वाढीव वीज बिल भरणे अवघड आहे. सरकारने यात तातडीने हस्तक्षेप करून हे थांबवावे आणि आमच्या सर्व समस्यांवर चर्चा करण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्र्यांना केली.
त्यानंतर बोलताना मानकापूर वीजमाग विणकर असोसिएशनचे अध्यक्ष अर्जुन कुंबार म्हणाले की, निप्पाणी, चिक्कोडी तालुक्यातील गावांमध्ये वीजेवर आधारित माग अधिक आहेत. पण कोणतीही नोटीस न देता हेस्कॉमने बिलात 55 टक्के वाढ केली आहे. निवडणुकीपूर्वी सिद्धरामय्या विरोधी पक्षनेते असताना, त्यांनी विक्रम 10 एचपीपर्यंत मोफत वीज देण्याचे व त्यापुढील वीजमागांना 1 रुपये प्रतियुनिट दराने वीज पुरवण्याचे आश्वासन दिले होते. पण आता हेस्कॉमकडून जबरी दरवाढ करून वीजबिले देण्यात येत आहे. ते थांबवावे अशी मागणी त्यांनी केली.
या आंदोलनात बेळगाव शहर व जिल्ह्यातील विणकर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Tags: