मच्छे नगरपंचायतीसमोर संगोळ्ळी रायण्णाचा पुतळा उभारण्याच्या मुद्द्यावरून मच्छे गावात तणाव निर्माण झाला आहे. कन्नड संघटनांच्या काही कार्यकर्त्यांनी पंचायतीसमोर रातोरात पुतळा उभारण्याचा प्रयत्न केल्याने हा तणाव निर्माण झाला आहे. सध्या पंचायतीभोवती कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला असून परिस्थिती नियंत्रणाखाली आहे.


मच्छे येथील जिजामाता चौकात नगर पंचायत कार्यालय आहे. मच्छे ग्रामपंचायतीला लोकसंख्या वाढल्याच्या कारणास्तव गेल्यावर्षी ग्रापंचायतीचा दर्जा देण्यात आला आहे. त्यानंतर नगरपंचायतीसमोर राजमाता जिजाऊ किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारायचा की, क्रांतिवीर संगोळ्ळी रायण्णा यांचा, या मुद्द्यावरून गेल्या काही दिवसांत वरचेवर कन्नड व मराठी भाषिकांत वाद निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर काल, रविवारी रात्री अचानक काही कन्नड कार्यकर्त्यांनी संगोळ्ळी रायण्णा यांचा पुतळा नगरपंचायतीसमोर आणून त्याची प्रतिष्ठापना करण्याचा प्रयत्न केला. याठिकाणी रात्रभर ठिय्या आंदोलन करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच डीसीपी शेखर एच. टी. यांनी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. खबरदारीचा उपाय म्हणून घटनास्थळी तगडा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून कन्नड समर्थक संघटना रायण्णा यांचा पुतळा बसवण्याची मागणी करत आहेत. तर जिजामाता किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्याची मागणी मराठी भाषिक करत आहेत. या सगळ्यात रात्रभर रायण्णाचा पुतळा पंचायतीसमोर ठेवून कन्नड संघटनांच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडला. यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. केएसआरपीची एक तुकडी घटनास्थळी पोहोचली आहे. डीसीपी शेखर एचटी यांच्या नेतृत्वाखाली कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. ही घटना बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.


Recent Comments