स्वच्छ-शुद्ध, प्रदूषणमुक्त पर्यावरण असेल तरच माणूस जिवंत राहणे शक्य आहे. त्यामुळे नैसर्गिक संसाधनांचा अतिवापर टाळून पुढील पिढीसाठी पर्यावरणाचा वारसा जपण्याचे आवाहन बेळगावचे उप वनसंरक्षणाधिकारी हर्ष भानू यांनी केले.

बेळगाव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बेळगाव वकील संघटना आणि वनविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आज सोमवारी बेळगाव न्यायालय आवारात “जागतिक पर्यावरण दिन” साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा देऊन डीएफओ हर्ष भानू पुढे म्हणाले की, पर्यावरणाचे रक्षण न केल्याने होणाऱ्या दुष्परिणामांना आपण सगळे सामोरे जात आहोत. त्यामुळे पर्यावरणाचे रक्षण करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. यासाठी घरोघरी, परिसरात रोपे लावून त्यांचे रक्षण केले पाहिजे. इंधनासह नैसर्गिक संसाधनांचा अति वापर टाळला पाहिजे. प्लास्टिकचा वापर थांबविला पाहिजे. वन खात्यातर्फे वनीकरण आणि वनसंरक्षणासाठी तसेच गेल्या ३ वर्षांपासून प्लास्टिक मुक्तीसाठी मोहीम राबविण्यात येत आहे. त्यात सर्वानी सहभाग घ्यावा. पुढील पिढीसाठी शुद्ध हवा, पाणी तसेच पोषक आहार देण्यासाठी स्वच्छ-शुद्ध पर्यावरणासाठी सर्वानी जबाबदारीने हातभार लावावा असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी बोलताना उद्योजक विजय शिरगुप्पी यांनी वाढत्या नागरीकरणामुळे सिमेंट कॉंक्रिटची जंगले निर्माण होत आहेत. त्यामुळे नैसर्गिक संसाधनांचे शोषण मोठया प्रमाणात होत आहे. सिमेंटसारख्या वस्तूंमुळे पर्यावरणाची मोठी हानी होत आहे. त्यामुळेच पूर, महापूर, अनावृष्टी, अतिवृष्टी, भूस्खलन, वादळे अशा नैसर्गिक आपत्तींना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे सर्वानी पर्यावरणाचे संरक्षण करण्याचे आवाहन केले. आपल्या जीवनातील लग्न, कुटुंबात मुला-मुलींचा जन्म अशा सर्व आनंदाच्या प्रसंगी प्रत्येकाने किमान एक झाड लावले पाहिजे. त्यातून पर्यावरणात भर घातल्यासारखे होईल असे त्यांनी सांगितले.
प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा एल. विजयालक्ष्मी देवी यांनी रोप लावून कार्यक्रमाचे उद्घाटन केले. फ्लो
बेळगाव विभागाचे मुख्य वनसंरक्षक मंजुनाथ चव्हाण अध्यक्षस्थानी होते. यावेळी बेळगाव वकील संघटनेचे अध्यक्ष प्रभू यत्नट्टी, सहाय्यक वनसंरक्षक शिवरुद्रप्पा कबाडगी, विभागीय वन अधिकारी पुरुषोत्तम राव जी.के., वकील संघटनेचे सचिव गिरीश एन पाटील, उपविभागीय वन अधिकारी विनय एस. गौडा आदी उपस्थित होते.


Recent Comments