बृहत आणि मध्यम उद्योग आणि पायाभूत सुविधा विकास मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच विजापुरात आलेल्या एम बी पाटील यांचे शहरात भव्य स्वागत करण्यात आले. भव्य रोड शो काढून कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले.

एम बी पाटील यांनी प्रथम शहरातील गुरुपादेश्वर नगर येथील तोंटदार्य शाखा मठाला भेट दिली. तेथे डॉक्टर सिद्धराम महास्वामी आणि विजापूर षण्मुखारुढ मठाचे अभिनव सिद्धारूढ महास्वामीजी यांनी त्यांचा सन्मान करून आशीर्वाद दिला. त्यानंतर शहरातील शिवाजी चौकात आलेल्या मंत्री एम बी पाटील यांना सजवलेल्या खुल्या वाहनातून रोड शो मार्गे गांधी चौक मार्गे श्री सिद्धेश्वर मंदिरात आणण्यात आले.

यावेळी मंत्री पाटील यांनी हितचिंतक, चाहते, समर्थक आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले. मिरवणूक मार्गावर मंत्र्यांच्या स्वागतासाठी लावण्यात आलेल्या स्वागत कमानी आणि फ्लेक्सने लक्ष वेधून घेतले. डीजे, लेझर लाईट, ढोलताशा, करडी मजलू पथकांच्या संगीताच्या तालावर, लोककलांच्या बाहुल्यांनी सहभाग घेऊन लोकांचे लक्ष वेधून घेतले. हातात काँग्रेस पक्षाचा झेंडा घेवून कार्यकर्ते आणि चाहत्यांनी जयघोष करत मिरवणुकीत सहभाग घेतला. रोड शोदरम्यान चाहत्यांनी जेसीबीवर उभे राहून फुले टाकून, मोठमोठे फुलांचे हार घालून, फटाके उडवून आनंद साजरा केला हे विशेष. फटाक्यांनी उत्सवात रंगांची उधळण करून लोकांना मंत्रमुग्ध केले. नंतर श्री सिद्धेश्वर मंदिरात आगमन झालेल्या एम बी पाटील यांनी श्री सिद्धरामेश्वरांना नमस्कार करून आशीर्वाद घेतले. यावेळी आमदार विठ्ठला धोंडीबा कटकडोंड, अशोक मनगुळी, विधान परिषद सदस्य सुनीलगौडा पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा. राजू अलगुर, नेते हमीद मुश्रीफ, संगमेश बबलेश्वर, सुरेश घोणसगी, ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष सिद्धू गौडनवर, इरनगौडा बिरादार, व्ही एस पाटील, डॉक्टर गंगाधर संबन्नी, जमिर बक्षी, अभियंता चांदसाब गडगलवा, बी एच मुंबारेड्डी, काँग्रेस महिला युनिटच्या जिल्हाध्यक्षा विद्याराणी तुंगळ, नगरसेवक, काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते, चाहते व समर्थक उपस्थित होते.


Recent Comments