Belagavi

दलितांनी बाबासाहेबांचे अभियान पुढे चालवावे : राजरत्न आंबेडकर

Share

शतकानुशतके शोषणात खितपत पडलेल्या दलित, वंचित समाजाला न्याय देण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रस्थापितांशी लढा देत अभियान राबविले. त्यांच्यामुळे आज समाजाच्या मुख्य प्रवाहात आलेल्या दलितांनी हे अभियान पुढे चालवावे असे आवाहन बाबासाहेबांचे चुलत पणतू राजरत्न आंबेडकर यांनी केले.

बेळगावातील सदाशिवनगरातील आंबेडकर भवनात बुद्धीस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या वतीने आज “एक पाऊल आर्थिक उन्नतीकडे” हा तरुणांसाठी मार्गदर्शन कार्यक्रम पार पडला. त्यावेळी मार्गदर्शन करताना राजरत्न आंबेडकर पुढे म्हणाले की, बाबासाहेबांनी आयुष्यभर वंचित आणि दलितांना न्याय देण्यासाठी अथक प्रयत्न केले. जातीव्यवस्था मोडून काढण्यासाठी कष्ट घेतले. जातीव्यवस्था बंद झाल्याशिवाय समाज म्हणून एकसंघ राहता येणार नाही असे सांगून त्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन 1936 मध्ये केले. मात्र त्याऐवजी आम्ही जातीव्यवस्था आणखी मजबूत केली. दलितांमध्येच वेगवेगळ्या जाती निर्माण करून आपसात भांडत बसलो. बाबासाहेबानी दिलेल्या सर्व सोयी-सुविधा पाहिजेत पण बाबासाहेब नकोत ही मानसिकता बनली आहे हे दुःखद आहे.


बाबासाहेबांना कम्युनल अवार्ड दिल्यावर महात्मा गांधींनी त्रागा केला. उपोषण केले. त्यामुळे बाबासाहेबानी हे अवार्ड परत केले. बाबासाहेबांना समाजासाठी खासकरून दलित, वंचितांसाठी आणखी भरपूर काम करायचे होते. मात्र ब्राह्मणी व्यवस्थेने ते करू दिले नाही. दुर्दैवाने आज बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी, त्यांचे अभियान पुढे चालविण्यासाठी दलितच पुढे येत नाहीत. शिकले-सवरलेले दलित बाबासाहेबांनी दिलेल्या वीज, पाणी, सरकारी नोकऱ्या, सुट्या आदी सुविधा घेतात, परंतु त्यांचे जातीव्यवस्था मोडून काढण्याचे अभियान राबविण्यासाठी पुढे येत नाहीत ही शोकांतिका आहे. महापरिनिर्वाणाच्या दहा महिने आधी बाबासाहेबांनी उत्तरप्रदेशातील आग्रा येथे एका भाषणात अशा लोकांना धोकेबाज असे संबोधले होते. दलितांनी असे धिकेबाज होऊ नये असे आवाहन राजरत्न आंबेडकर यांनी केले.

प्रारंभी राजरत्न आंबेडकर यांच्याहस्ते भगवान गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला. यावेळी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष शशिकांत जाधव, कार्याध्यक्ष महेश धर्मरक्षित, प्रा. अनिल मसाळे, मल्लेश चौगुले, सिद्दप्पा कांबळे, अरविंद गट्टी, बसवराज रामप्पागोळ, महादेव तळवार, जीवन कुरणे यांच्यासह विविध दलित संघटनांचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.

Tags: