पतीच्या आयुष्याचं दान मागण्याची वटपौर्णिमा बेळगावात आज उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त शहर परिसरात ठिकठिकाणी वडाच्या झाडाला दोरा गुंडाळून सवाष्णींनी सौभाग्याचं लेणं मागितलं.


आज ज्येष्ठ शुद्ध चतुर्दशी, पौर्णिमा. वटपौर्णिमा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पौर्णिमेला हिंदू धर्मात महिलांच्या दृष्टीने खप महत्व आहे. पतीला दीर्घायुष्य लाभावं म्हणून महिला या दिवशी आंबा, जांभूळ, सफरचंद आदी पाच फळे, हळदीकुंकू असलेले तबक घेऊन वडाच्या झाडाची पूजा करतात. पतीला दीर्घायुष्य लाभू दे, जन्मोजन्मी हाच पती लाभू दे अशी मनोभावे प्रार्थना करतात. या पार्श्वभूमीवर आज बेळगाव परिसरात अशा पद्धतीने वडाच्या झाडांचे पूजन करून वटपौर्णिमा श्रद्धा-भक्तीने साजरी करण्यात आली. बेळगावातील सोन्या मारुती मंदिर, समादेवी गल्लीतील समादेवी मंदिराशेजारी व जिथेजिथे वडाची झाडे आहेत त्या ठिकाणी आज सकाळपासूनच महिलांनी वडाच्या पूजेसाठी गर्दी केली होती. वडाच्या झाडाला सुती धागा बांधून, हळदीकुंकू, फळे वाहून मनापासून पूजा करताना सवाष्णी महिला दिसून आल्या. नव्या पारंपरिक साड्या नेसून, नटून-थटून तरुण, प्रौढ अशा सर्व वयोगटातील सवाष्ण महिला आनंदाने, उत्साहात वडाची पूजा करताना दिसून आल्या.

या संदर्भात ‘इन न्यूज-आपली मराठी’ला माहिती देताना मराठा मंडळच्या शिक्षिकेने सांगितले की, सुवासिनी देवाकडे सौभाग्याचं लेणं मागण्यासाठी वटपौर्णिमेचं व्रत करतात. या दिवशी उपवास करून वडाच्या झाडाची पूजा करण्याची परंपरा आहे. त्यानुसार आम्ही मराठा मंडळच्या सर्व शिक्षिका मिळून सोन्या मारुती मंदिरात हे व्रत करत आहोत. खरंतर यामागे शास्त्रीय संदेशही आहे. वड हा भपूर प्राणवायू देणारा वृक्ष आहे. त्यामुळे त्याच्या सानिध्यात रहा, वृक्षारोपण करा, झाडे लावा अन जगवा हा संदेश देण्यासाठी या व्रताला धार्मिक रूप देऊन त्याचे आचरण केले जाते अशी माहिती त्यांनी दिली.

दुसऱ्या एका महिलेने सांगितले की, लग्न होऊन तीन वर्षे झाली असून तेंव्हापासून न चुकता हे व्रत करते. पतीला दीर्घायुष्य लाभो, आपले सौभाग्य अखंड राहो यासाठी हे व्रत केले जाते. वडाच्या झाडाची पूजा करून 5 किंवा 7 सवाष्ण महिलांची ओटी भरून हे व्रत केले जाते असे त्यांनी सांगितले.
एका ठिकाणी सासू व सून दोघीनींही मिळून वडाची पूजा करून वटपौर्णिमा करताना दिसून आल्या. सासुबाईंनी सांगितले की, जन्मोजन्मी हाच पती मिळू दे म्हणून महिला हे व्रत करतात. वर्षातून एकदा येणाऱ्या या सणाची आम्ही महिला आतुरतेने वाट पाहतो असे त्या म्हणाल्या, तर तेजस्विनी स्वप्नील पाटील या त्यांच्या सुनबाईने, यंदा आपण पहिली वटपौर्णिमा साजरी करताना आनंद होत असल्याचे सांगितले. इतकी वर्षे सवाष्ण महिलांना हे व्रत करताना बघत होते. मात्र यंदा सासूबाईंच्या मार्गदर्शनाखाली पहिली वटपौर्णिमा साजरी करताना खूप आनंद वाटतोय असे सांगितले. बाईट
एकंदर, बेळगावातील महिलांनी श्रद्धाभक्तीने जन्मोजन्मी हाच पती मिळू दे अशी प्रार्थना देवाकडे करत वटपौर्णिमा साजरी केल्याचे दिसून आले.


Recent Comments