कौटुंबिक वादातून पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना बेळगाव जिल्ह्यातील मुडलगी तालुक्यात घडली. पत्नीचा गळा आवळून खून केल्यानंतर आरोपी पती पोलिसांना शरण आला.
ही घटना मुडलगी तालुक्यातील नागनूर गावात शुक्रवारी रात्री घडली. 30 वर्षीय बसव्वा हनमंत हिडकल असे खून झालेल्या दुर्दैवी महिलेचे नाव असून, तिचा पती 35 वर्षीय हनमंत सिद्धप्पा हिडकल याच्यावर तिचा गळा आवळून खून केल्याचा आरोप आहे.
पती हनमंत कोणतेही काम न करता इकडे तिकडे फिरत होता असे सांगण्यात येते. बायको मोलमजुरी करून संसाराचा गाडा चालवायची. बसव्वा पतीला कामाला जाण्यास सांगत असे. त्यामुळे घरात दोघांमध्ये रोज भांडणे व्हायची. अशा प्रकारे शब्दाला शब्द लागून वाद वाढत गेला आणि शुक्रवारी झालेल्या भांडणाचे रुपांतर बसव्वाच्या हत्येत झाले. या जोडप्याला 10 वर्षांचा मुलगा आहे. या घटनेत आईचा मृत्यू झाला आणि वडील तुरुंगात गेले. यामुळे 10 वर्षांचा मुलगा अनाथ झाला आहे. याप्रकरणी मुडलगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Recent Comments