देशभरात गाजलेल्या महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळाच्या प्रकरणी भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी रयत संघाच्या नेत्या जयश्री गुरन्नावर यांच्या नेतृत्वाखाली विविध संघटनांनी बेळगावात आज निदर्शने केली.


या संदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना सिद्धगौडा मोदगी म्हणाले की, देशातील महिला कुस्तीपटूंवर होत असलेल्या लैंगिक हिंसाचाराच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर कुस्तीपटू दिल्लीतील जंतरमंतरवर गेल्या ४५ दिवसांपासून सतत उपोषणाला बसले आहेत. पोलिसांनी आंदोलकांवर ज्या प्रकारे कारवाई केली ते खेदजनक आहे. या प्रकरणाची चौकशी न करता कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजपचे खासदार ब्रिजेस भूषणसिंह यांना संरक्षण दिल्याबद्दल मोदगी यांनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली. ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ असे म्हणत लोकप्रियता मिळवणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशासाठी सुवर्णपदके जिंकणाऱ्या महिला कुस्तीपटूंचे रक्षण करावे अशी मागणी त्यांनी केली.

बेळगावात शहरातील कन्नड साहित्य भवन ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत विविध संघटनांनी मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन दिले. सिंग यांच्यावर कठोर कारवाई न झाल्यास ५ जून रोजी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला.


Recent Comments