बेळगावच्या पाणी पुरवठ्याचा प्रमुख श्रोत असलेल्या राकसकोप जलाशयाने तळ गाठला असून केवळ तीन फूट पाणीसाठा शिल्लक आहे. या पार्श्वभूमीवर महापौर शोभा सोमनाचे आणि उपमहापौर रेश्मा पाटील यांनी आज अधिकाऱ्यांसमवेत राकसकोप जलाशयाला भेट देऊन पाणीसाठ्याची पाहणी केली. नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन त्यांनी यानिमित्ताने केले.
राकसकोप जलाशयाच्या डेड स्टॉकमध्ये आता केवळ तीन फूट पाणीसाठी शिल्लक असून त्यात वाढ होण्यासाठी आता प्रशासनाची पावसावरच भिस्त आहे. या पार्श्वभूमीवर महापौर शोभा सोमनाचे आणि उपमहापौर रेश्मा पाटील यांनी आज मनपा, पाणी पुरवठा मंडळ आणि एल अँड टी कंपनीच्या अधिकाऱ्यांसमवेत राकसकोप जलाशयाला भेट देऊन पाणीसाठ्याची पाहणी केली. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांकडून जलाशयातील पाणीसाठा, तो किती दिवस पुरेल आदी बाबींची माहिती घेतली.


त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना महापौर शोभा सोमनाचे यांनी सांगितले की, राकसकोप धरणातील पाणीसाठा खूप कमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर आज आम्ही जलाशयाची पाहणी केली आहे. पाणीसाठा खूप कमी झाला आहे. लगेचच पाऊस झाला तर पाणीसाठा वाढू शकेल. त्यामुळे सध्या पुरेशा प्रमाणात पाणी पुरवताना अडचण येत आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावे आणि प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी प्रसारमाध्यमांना माहिती देताना केयूआयडीएफसी अधीक्षक अभियंता अशोक बुरकुले म्हणाले की, राकसकोप जलाशयातून 68 एमएलडी पाणी पुरवठा करण्याची क्षमता आहे. बेळगाव शहराला येथून दररोज 55 एमएलडी पाणी पुरवठा करण्यात येतो. मात्र सध्या पाणीपातळी कमी झाल्याने केवळ 30 एमएलडी पाणी पुरविण्यात येत आहे. पाऊस न झाल्याने ही परिस्थिती ओढवली आहे. आठवडाभरात पावसाळा सुरवात होण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर पुरवठा सुरळीत होईल. तोवर बेळगावच्या नागरिकांनी आम्हाला सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी महापौर शोभा सोमनाचे, उपमहापौर रेश्मा पाटील यांनी अधिकाऱ्यांकडून धरणातील पाणीसाठा, पाणी सोडण्याची प्रक्रिया आदींची पाणी उपसा केंद्राला भेट देऊन तांत्रिक माहिती घेतली. यावेळी नगरसेवक श्रेयस नाकाडी, सहाय्यक कार्यकारी अभियंता शशिकुमार हट्टी, सहाय्यक अभियंता उमेश निट्टूरकर, केयूडब्ल्यूएस अँड डीबी सहाय्यक अभियंता मंजुनाथ, स्मार्टसिटी टीम लीडर रामचंद्रय्या, एल अँड टी ओ अँड एम रवीकुमार,
मनपा पर्यावरण अभियंते कलादगी व प्रवीण आदी उपस्थित होते.


Recent Comments