Belagavi

शिवजयंती मिरवणुकीसाठी रवी पाटील यांच्याकडून दोन रुग्णवाहिका

Share

बेळगाव शहरात उद्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यासाठी भाजप नेते डॉक्टर रवी पाटील यांनी दोन रुग्णवाहिकांचा व्यवस्था केली आहे. या रुग्णवाहिकांचे आज धर्मवीर संभाजी महाराज चौकात पूजन करण्यात आले.

धर्मवीर संभाजी महाराज चौकात रवी पाटील, तसेच माजी आमदार अनिल बेनके, भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष संजय पाटील, माजी एमएलसी महांतेश कवटगीमठ, परशुरामभाऊ नंदिहळ्ळी, शिवाजी सुंठकर आदींच्या हस्ते धर्मवीर संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला भव्य पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. त्यानंतर या मान्यवरांच्या हस्ते रुग्णवाहिकांचे पूजन करून त्या शिवजयंती मिरवणुकीच्या सेवेत दाखल करण्यात आल्या.

यावेळी बोलताना डॉक्टर रवी पाटील म्हणाले की, बेळगावला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आणि चित्ररथ मिरवणुकीची भव्य परंपरा आहे. बेळगावच नव्हे तर महाराष्ट्र, गोवा आणि परजिल्ह्यातून मोठ्या संख्येने लोक ही मिरवणूक पाहण्यास येतात. मिरवणुकीत आपत्कालीन परिस्थितीत उपयोगी पडण्यासाठी मी विजया हॉस्पिटलतर्फे दोन रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या आहेत. सर्वानी उत्साह आणि शांततेत शिवजयंती मिरवणूक पार पाडण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी बोलताना माजी आमदार व भाजप महानगर जिल्हाध्यक्ष अनिल बेनके म्हणाले की, बेळगावात उद्या सायंकाळी सहा वाजता नरगुंदकर भावे चौकातून शिवजयंती मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून कार्यकर्ते परीश्रम घेत आहेत. सर्वानी ही मिरवणूक उत्साहात व शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले. बाईट
भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष संजय पाटील म्हणाले की, दिवाळी सण हा सगळ्यात मोठा सण मानला जातो. परंतु आम्हा बेळगावकरांसाठी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती दिवाळीपेक्षाही मोठा सण आहे. निष्ठा, श्रद्धा-भक्तीने बेळगावात शिवजयंतीची भव्य मिरवणूक काढण्यात येते. ही मिरवणूक पाहण्यासाठी बेळगाव जिल्ह्यासह गोवा आणि महाराष्ट्रातूनही शिवप्रेमी येतात. त्यासाठी रवी पाटील यांनी रुग्णवाहिका उपलब्ध करून देऊन चांगले काम केले आहे. आपण निवडणुकीत हरलो असलो तरी मनाने हरलो नाही हे यातून त्यांनी दाखवून दिले आहे. त्याबद्दल त्यांचे आभार मानतो असे सांगितले.


माजी विधान परिषद सदस्य महांतेश कवटगीमठ म्हणाले की, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती बेळगावात अत्यंत भव्य प्रमाणात काढली जाते. पुढच्या पिढीला मार्गदर्शन करण्यासाठी, हिंदू समाजात जागृती करण्यासाठी हे गरजेचे आहे. उद्याची मिरवणूक शांततेत आणि उत्साहात पार पाडण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, भारतमाता की जय आदी घोषणा देण्यात आल्या. माजी आमदार परशुरामभाऊ नंदिहळ्ळी, लोकमान्य टिळक मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष विजय जाधव, इन न्यूज वृतवाहिनीचे मुख्य संपादक राजशेखर पाटील, चित्ररथ मिरवणूक मंडळाचे अध्यक्ष सुनील जाधव, हॉटेल उद्योजक हरीश गुलबानी यांच्यासह शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: