शिवजयंती मिरवणुकीसाठी बेळगावात दोन हजार पोलिसांचा तगडा बंदोबस्त बेळगावात तैनात करण्यात आला आहे. शिवजयंती मिरवणुकीच्या पूर्वसंध्येला पोलिसांनी आज भव्य रूट मार्च काढला. कोणताही अनुचित प्रकार खपवून न घेण्याचा इशारा देत या रूट मार्चने समाजकंटकांना धडकी भरवली.
बेळगावात उद्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त भव्य चित्ररथ मिरवणूक काढण्यात येणार आहे. मिरवणूक शांततेत पार पडावी यासाठी पोलीस आयुक्त डॉक्टर एम. बी. बोरलिंगय्या यांच्या नेतृत्वाखाली शहरात आज पोलिसांचे पथसंचलन पार पडले. पोलीस बँडच्या साथीने काढण्यात आलेल्या या रूट मार्चने समाजकंटकांना धडकी भरवली. चन्नम्मा चौकातून रूट मार्चला प्रारंभ झाला. त्यानंतर काकतीवेस, शनिवार खुंट, भेंडीबाजार आदी प्रमुख मिरवणूक मार्गावरून फिरून धर्मवीर संभाजी चौकात रूट मार्चची सांगता झाली.
यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना पोलीस आयुक्त बोरलिंगय्या म्हणाले की, बेळगावच्या शिवजयंतीला एक ऐतिहासिक परंपरा आहे. ही मिरवणूक पाहण्यासाठी दरवर्षी लाखो लोक येतात. उद्याही लाखो लोक येणार आहेत. त्यामुळे मिरवणूक सुरळीत पार पाडण्यासाठी महानगरपालिका, हेस्कॉम, बांधकाम विभाग स्मार्टसिटी आदी खात्यांशी, उत्सव मंडळ पदाधिकाऱ्यांशी बैठक घेऊन, चर्चा करून आम्ही सर्व व्यवस्था केली आहे.

पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वाखाली अधिकारी, पोलीस शिपाई आणि होमगार्ड्स मिळून ऐकणं सुमारे २७०० पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे आकाशातून मिरवणुकीवर नजर ठेवण्यात येईल. त्याशिवाय मिरवणूक मार्गावर सुमारे ३०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे. अनुचित प्रकार टाळण्यासाठी आम्ही सर्व खबरदारी घेतली असून, मिरवणूक सुरळीत पार पाडण्यासाठी आम्ही सज्ज आहोत असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, पोलिसांच्या या रूट मार्चमुळे बेळगाववासियांत धैर्य निर्माण झाले आहे.


Recent Comments