बेळगाव शहरात येत्या शनिवारी काढण्यात येणारी हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मिरवणूक शांततेत उत्साहात पार पाडण्याचा निर्णय मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळ पदाधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठकीत आज घेण्यात आला.
बेळगावात आज शिवजयंती मिरवणुकीसंदर्भात पोलीस आयुक्त कार्यालयात पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांच्या अध्यक्षतेखाली मध्यवर्ती शिवजयंती उत्सव महामंडळ तसेच शहरातील शिवजयंती उत्सव मंडळांचे पदाधिकारी आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी पोलीस आयुक्त बोरलिंगय्या यांच्यासह विविध मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी मिरवणुकीसंदर्भात विविध सूचना करून सल्ले दिले.
यावेळी बोलताना शहापूर विभाग मध्यवर्ती शिवजयंती उत्सव महामंडळाचे अध्यक्ष माजी नगरसेवक नेताजी जाधव यांनी, मिरवणूक पाहण्यासाठी नाथ पै चौकात नागरिकांची मोठी गर्दी होत असल्याने तेथे प्रेक्षक गॅलरी उभारण्याची सूचना केली. त्याचप्रमाणे शहापूर विभागातील उत्सव मंडळांचे चित्ररथ शनिमंदिर पासून कॅम्पमार्गे धर्मवीर संभाजी महाराज चौकाकडे वळून मुख्य मिरवणुकीत सहभागी होतात. शनिमंदिर ते कॅम्प उभा मारुती पुतळ्यापर्यंत पथदीप बंद असतात. दरवर्षी सूचना देऊनही ते सुरु केले जात नाहीत. त्यामुळे ते सुरु ठेवण्याची व्यवस्था प्रशासनाने करावी अशी सूचना जाधव यांनी केली.
शिवजयंती चित्ररथ महामंडळाचे अध्यक्ष सुनील जाधव यांनी सांगितले की, प्रशासन आणि मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या सूचनांनुसार सर्वानी मिळून शांततेत व उत्साहात शिवजयंती मिरवणूक पार पाडू. मिरवणूक मार्गावर खडेबाजार, अमरकॉन ते आयडीबीआय बँक दरम्यान मिरवणुकीत खंड पडल्याचे दिसून येते, ते टाळावे. मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या मंडळांच्या चित्ररथांचा नंबर लागावा यासाठी दुपारी चार वाजताच मारुती गल्लीत उपस्थित रहावे आणि शिवपालखीच्या पूजनानंतर लगेचच मिरवणुकीत सहभाग घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. बाईट
यावेळी बोलताना मध्यवर्ती गणेशोत्सव शिवजयंती उत्सव मंडळाचे जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी म्हणाले की, बेळगावातील शिवजयंती मिरवणूक म्हैसूर दसरा उत्सवाच्या तोडीची असते. ती पाहण्यासाठी केवळ बेळगावच नव्हे तर कोल्हापूर, गोवा आदी परराज्यातील शिवभक्त मोठ्या संख्येने बेळगावात येतात. त्यात महिला, लहान मुले आणि ज्येष्ठांची संख्याही मोठी असते. त्यामुळे यंदे खूट ते धर्मवीर संभाजी महाराज चौक या भागात प्रेक्षक गॅलरी उभारावी. त्याचप्रमाणे मिरवणूक पाहण्यास येणाऱ्या नागरिकांसाठी प्रमुख चौकात पिण्याच्या पाण्याची सोय करावी, रामदेव गल्ली आदी अरुंद रस्त्यांवर विशेष दक्षता घ्यावी अशी सूचना कलघटगी यांनी केली.
पदाधिकाऱ्यांच्या सूचना ऐकून घेतल्यानंतर बैठकीला मार्गदर्शन करताना पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांनी, मिरवणुकीत छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे चारित्र्य आणि संस्कृती दाखवण्यासाठी शांततेत व सुरळीत मिरवणूक पार पाडण्यास सर्वानी सहकार्य करण्याचे आवाहन केले. डीजे बेसला परवानगी देण्यात येणार नसल्याचे स्पष्ट करून ते म्हणाले की, अनेक मंडळांचे पदाधिकारी चित्ररथ मिरवणुकीत शिवचरित्रातील नाट्यप्रयोग सादर करतात. त्यासाठी महिनाभर आधीपासून परिश्रम घेतात. पण डीजेमुळे हे प्रयोग सादर करताना अडथळा येतो. प्रयोग सादर करतानाच एखाद्या मंडळाचा डीजे वाजल्याने शिवप्रेमींना प्रयोग पाहताना त्रास होतो. त्याशिवाय ध्वनी प्रदूषणही होते. त्यामुळे डीजेचा वापर टाळून सामान्य साउंड सिस्टीम वापरण्याचा सल्ला त्यांनी दिला. मिरवणूक वेळेत सुरु करून वेळेत संपवून, छत्रपती शिवरायांची समृद्ध परंपरा आणि संस्कृतीचा हा उत्सव शांततेत पार पाडून सर्वना आनंद देण्याचे आवाहन त्यांनी केले. ज्या मंडळांनी अजूनही परवानग्या घेतलेल्या नाहीत त्यांनी त्वरित अर्ज द्यावेत, त्यांना तातडीने परवानग्या देण्यात येतील असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना लोकमान्य टिळक मध्यवर्ती गणेशोत्सव शिवजयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष विजय जाधव यांनी या बैठकीचे आयोजन करून पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतल्याबद्दल पोलीस व प्रशासनाचे आभार मानले. बैठकीत विविध पदाधिकाऱ्यांनी सूचना केल्या. पोलीस आयुक्त बोरलिंगय्या आणि अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. बेळगावची ऐतिहासिक शिवजयंती मिरवणूक पाहण्यास परजिल्ह्यातून व परराज्यातूनही शिवप्रेमी येतात. त्यांना पाणी व अन्य सुविधा पुरविण्याची सूचना पदाधिकाऱ्यांनी केल्याचे त्यांनी सांगितले. बाईट
बैठकीला मध्यवर्ती शिवजयंती उत्सव महामंडळाचे पदाधिकारी माजी महापौर मालोजीराव अष्टेकर, मदन बामणे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.
Recent Comments