सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखाली राज्य मंत्रिमंडळाची स्थापना होत असून, जैन समाजाचे एकमेव आमदार डी. सुधाकर यांना मंत्रिपद देण्याची मागणी जैन समाजाने केली आहे.

भारतीय जैन संघटनेच्या बेळगाव शाखेचे अध्यक्ष अरुण यलगुद्री यांनी शुक्रवारी कागवाड येथे आयोजित पत्रकार परिषदेत सिद्धरामय्या यांना निवेदनाद्वारे विनंती केली की, सुधाकर यांची निवड झाली असून त्यांना मंत्रिमंडळात चांगले स्थान देण्यात यावे. जैन समाज आणि काँग्रेस पक्षाचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. शेडबाळचे सुपुत्र आणि जैन समाजाचे राष्ट्रीय संत विद्यानंद मुनी महाराज यांनी पक्ष अडचणीत असताना देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना हाताचे चिन्ह दिले. तेव्हापासून जैन समाज काँग्रेस पक्षाला अधिक पसंती देत आहे.
भारतातील ९४% शिक्षित, अहिंसक, सहिष्णू जैन समाजाचे एकमेव आमदार डी. सुधाकर निवडून आले आहेत. माजी मुख्यमंत्री देवराज अरसू, आर. गुंडूराव, वीरेंद्र पाटील, एस. बंगारेप्पा, वीरप्पा मोईली, एसएम कृष्णा, धर्मसिंग आणि सिद्धरामय्या यांनी त्यांच्या मंत्रिमंडळात जैन समाजाला स्थान देऊन सामाजिक न्यायाचे पालन केले. त्या अनुषंगाने या वेळीही सामाजिक न्यायाने डी. सुधाकर यांना मंत्रिमंडळात घेऊन जैन समाजाला न्याय देण्याची विनंती यलगूद्री यांनी केली.
यावेळी कर्नाटक जैन संघटनेचे बंगळूरचे उपाध्यक्ष ए. सी. पाटील, वकील संजय कुचनुरे, तात्यासाहेब धोतरे, अभिनंदन पडनाड, मिलिंद पाटील, श्रीकांत आस्की, सुरेश चौघुले आदी उपस्थित होते.


Recent Comments