Belagavi

जैन आगम मिशनच्या शिबिराला चांगला प्रतिसाद

Share

बेळगावातील अनगोळ येथील वाडा कंपाऊंड येथे जैन आगम मिशनच्या वतीने “ज्ञान-2023” या धार्मिक संस्कार शिबिराचे लहान मुलांसाठी आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराला चांगला प्रतिसाद मिळत आहे.


तीर्थन्करांच्या अहिंसेच्या संदेशाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी जैन आगम मिशन ही संस्था बेळगावात अनेक उपक्रम राबवित आहे. गेल्या सात वर्षांपासून संस्थेकडून जैन धर्मातील लहान मुलांवर लहान वयातच चांगले धार्मिक संस्कार करण्याच्या हेतूने दरवर्षी उन्हाळी सुटीत शिबिराचे आयोजन केले जात आहे. यावर्षी अनगोळमधील वाडा कंपाऊंडमध्ये 16 ते 20 मे दरम्यान या 5 दिवसीय शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिराला केवळ अनगोळच नव्हे तर टिळकवाडी, मजगाव परिसर आणि बेळगाव शहरातूनही पालक आणि मुलांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. दररोज सकाळी सात वाजल्यापासून शिबिरातील दिवस सुरु होतो. दिवसभरात जैन धर्माच्या 24 तीर्थन्करांचे संदेश, शिकवण, पूजा अर्चा, धार्मिक विधिविधान आदींचे प्रशिक्षण शिबिरार्थींना देण्यात येत आहे. दर्शनाचार्य मिथुन शास्त्री आणि अनेकांत शास्त्री हे प्रशिक्षण देत आहेत.

या शिबिराबद्दल ‘इन न्यूज-आपली मराठी’ला अधिक माहिती देताना मुख्य प्रशिक्षक दर्शनाचार्य मिथुन शास्त्री यांनी सांगितले की, या शिबिराचा मुख्य उद्देश बेळगावातील सर्व मुलांना जैन धर्माचे आचारविचार आणि संस्कृतीची माहिती देणे हा आहे. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी 500 हून अधिक मुलांनी शिबिरात सहभाग घेतला. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मोठ्या थाटामाटात शिबिराचे आयोजन करण्यात आले, पूजा पाठ, अभिषेक व सर्व उपासना पद्धती सांगून जैन धर्माचे संस्कार देण्यात येत आहेत. या शिबिराला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

पालक माता शैला परेश पाटील यांनी सांगितले की, अतिशय शांत वातावरणात मुलांना येथे धार्मिक बाबींचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. मुलेसुद्धा आवडीने हे शिक्षण घेत आहेत. आजकाल मुलांना मोबाईलपासून दूर करणे एक आव्हान बनले आहे. परंतु या शिबिराच्या निमित्ताने मुले मोबाईल विसरली आहेत. याठिकाणी चांगले धार्मिक प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्यामुळे लहान वयातच मुलांना चांगले संस्कार मिळत आहेत.

एकंदर या शिबिराला पालक आणि मुलांचा उत्साही प्रतिसाद लाभत असून 20 मे रोजी धार्मिक मिरवणुकीने या शिबिराची सांगता होणार आहे.

Tags: