Banglore

विधीमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर हायकमांड घेतील पुढील निर्णय : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे

Share

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळवल्यानंतर काँग्रेसने पुढचा मुख्यमंत्री निवडून सरकार स्थापन करण्याची कसरत सुरू केली आहे. आज बंगळुरूमध्ये विधिमंडळ पक्षाची महत्त्वाची बैठक होणार आहे. तर दुसरीकडे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे दिल्लीत पोहोचले आहेत. विधीमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर हायकमांड पुढील निर्णय घेईल, असे खरगे यांनी सांगितले.

कर्नाटक निवडणुकीत काँग्रेसच्या विजयानंतर खर्गे पहिल्यांदाच राजधानीत परतले आहेत. काँग्रेस कार्यकर्त्यांचे आणि नेत्यांचे येथे जल्लोषात स्वागत करण्यात आले. दिल्ली विमानतळावर उतरताच ज्येष्ठ नेत्यांनी खर्गे यांना पुष्पगुच्छ देऊन पुष्पवृष्टी केली. नंतर ते त्यांच्या निवासस्थानी पोहोचल्यानंतरही कार्यकर्त्यांनी खर्गे यांचे जल्लोषात स्वागत केले.

प्रसारमाध्यमांशी बोलताना काँग्रेसचे अध्यक्ष खर्गे म्हणाले कि , आमचे तीन निरीक्षक बंगळुरूला रवाना झाले आहेत. त्यांच्या आगमनानंतर काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. या बैठकीनंतर ते हायकमांडसमोर आपले मत मांडतील. त्यानंतर हायकमांड येथूनच निर्णय कळवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, कर्नाटकातील जनतेने भाजपला नाकारून काँग्रेस पक्षाला पुन्हा सत्तेत आणले आहे. जनतेने आम्हाला विक्रमी मते दिली आहेत. आमच्या मंत्रिमंडळाच्या स्थापनेनंतर जाहीरनाम्यात जनतेला दिलेली पाचही आश्वासने आम्ही अमलात आणू, अशी माहिती खरगे यांनी दिली.

Tags: