Belagavi

मतदान सुरळीत पार पाडण्यासाठी बेळगाव जिल्हा प्रशासन सज्ज

Share

विधानसभा निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी बेळगाव जिल्हा प्रशासनाने सर्व खबरदारी घेतली असून, संपूर्ण जिल्ह्यात 3767574 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी व मुख्य निवडणूक अधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले.

बेळगावात आज पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या, पोलीस अधीक्षक डॉ. संजीव पाटील यांच्यासमवेत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना मुख्य निवडणूक अधिकारी नितेश पाटील म्हणाले की, येत्या बुधवारी 10 मे रोजी सकाळी 7 वाजता मतदानाला प्रारंभ होऊन सायंकाळी 6 वाजता मतदान संपेल. मतदान सुरु होण्यापूर्वी 90 मिनिटे आधी सर्व मतदान केंद्रांवर मतदानाचे प्रात्यक्षिक घेण्यात येईल. त्यानंतर बरोबर 7 वाजता मतदानाला प्रारंभ करण्यात येईल. बेळगाव जिल्ह्यात राज्यात सर्वाधिक 18 ते 19 वयाचे 94,652 मतदार असून त्यांना मतदानाचे प्रशिक्षण दिले आहे. प्रथमच मतदान करणारे आणि नव्याने मतदान करणाऱ्यांची एकूण संख्या 2,29,874 इतकी आहे असे ते म्हणाले. मतदानास येताना मतदार ओळखपत्र घेऊन आले पाहिजे.

 

एखादेवेळी मतदार ओळखपत्र उपलब्ध नसेल तर आधारकार्ड, नरेगा कार्ड, फोटोसह बँक पासबुक, ड्रायव्हिंग लायसेन्स, हेल्थ इन्शुरन्स कार्ड, पॅन कार्ड, अपंग प्रमाणपत्र अशा फोटोसह असलेल्या ओळखपत्रांच्या आधारे मतदान करू दिले जाईल. मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी, शौचालये आदी आवश्यक सुविधा पुरविण्यात येतील. पावसाची शक्यता गृहीत धरून ताडपत्री व आवश्यक साहित्याचा पुरवठा केंद्रांना करण्यात आला आहे. बेळगाव जिल्ह्यात 80 वर्षांवरील आणि दिव्यांग मतदारांसाठी निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार घरबसल्या मतदान योजना राबवण्यात आली असून, त्याला विक्रमी प्रतिसाद लाभल्याचे त्यांनी सांगितले. त्याशिवाय आरपीडी कॉलेजमध्ये स्ट्रॉंग रूम करून मतमोजणीची व्यवस्था केल्याचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले.

यावेळी बोलताना शहर पोलीस आयुक्त डॉ. बोरलिंगय्या म्हणाले की, विधानसभा निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलीस खात्याने सहा महिन्यांपूर्वी पासूनच तयारी चालवली होती. मतदारांना भयमुक्त वातावरणात मतदान करता यावे अशी व्यवस्था केली आहे. ठिकठिकाणी पोलीस पथसंचलन करून समाजकंटकांवर जरब बसवण्यात आली आहे. मतदानादिवशी मतदान केंद्रांत व परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. उद्या सकाळी पोलीस तुकड्या नेमलेल्या मतदान केंद्रांवर रवाना होणार आहेत. नागरी पोलिसांसह निमलष्करी पोलीस, केएसआरपी, डीएआर पोलीस आणि होमगार्ड्स तैनात केले आहेत असे सांगून अधिक माहिती दिली.

जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजीव पाटील यांनी मतदान सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्ह्यात केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. नागरी, राखीव, निमलष्करी, गोवा असे एकूण 9 हजार पोलीस अधिकारी व कर्मचारी जिल्हाभरात तैनात करण्यात आले आहेत. निवडणूक विषयक गुन्ह्यांत यापूर्वी सामील असलेले आणि समाजकंटकांकडून सदवर्तनाची हमी देणारी प्रतिज्ञापत्रे लिहून घेण्यात आली आहेत. महत्वाच्या गावात, संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्रांच्या सभोवताली सशस्त्र पोलिसांचा जागता पहारा ठेवण्यात येणार आहे असे सांगून एसपी डॉ. पाटील यांनी अधिक माहिती दिली.

यावेळी जिल्हा पंचायत सीईओ हर्षल भोयर यांनी गावोगावच्या सर्व मतदान केंद्रांना आवश्यक सुविधा पुरविण्यात आल्याचे सांगितले. निवडणूक काळात आजवर मतदारांना वाटण्यासाठी नेण्यात येणारी आमिषे, योग्य कागद्पत्राअभावी नेण्यात येत असलेली एकूण 9 कोटी 24 लाख रुपये रोख रक्कम विविध चेकपोस्टवर जप्त केली आहे. त्यापैकी सुमारे 6 कोटी रक्कम पुढील तपास, चौकशीसाठी पँटी कर खात्याकडे वर्ग केली असून, उरलेली 3.5 कोटी रक्कम न्यायप्रविष्ट आहे असे त्यांनी सांगितले.

एकंदर, यंदाची विधानसभा निवडणूक निर्भय व मुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी बेळगाव जिल्हा प्रशासन आणि पोलीस दलाने चांगलीच खबरदारी घेत तयारी पूर्ण केल्याचे दिसून येते.

Tags: