Belagavi

नेमिनाथ कुण्णे यांचे मरणोत्तर नेत्र, त्वचा आणि देहदान

Share

शिवाजीनगर, बेळगाव येथील रहिवासी, ज्येष्ठ वकील, केएलई संस्थेचे विधी सल्लागार नेमिनाथ (नेमाण्णा) दादा कुण्णे यांचे आज सकाळी निधन झाले. ते 78 वर्षांचे होते. त्यांच्या इच्छेनुसार त्यांचे डॉ. रामण्णावर चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून नेत्र, त्वचा व देहदान करण्यात आला असून यामुळे मृत्यूनंतरही ते अमर झाले आहेत.

त्यांचे डोळे केएलई डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटलच्या नेत्र भंडाराला दान करण्यात आले. त्यामुळे दोघांच्या आयुष्यात प्रकाशकिरण उजळणार आहेत. भाजलेल्या रूग्णांना लवकर बरे होण्यासाठी त्यांची त्वचा याच हॉस्पिटलच्या केएलई रोटरी स्किन बँकेला दान करण्यात आली आहे. वैद्यकीय विद्यार्थ्यांना अभ्यासात उपयोगी पडावा यासाठी त्यांचा मृतदेह जे. एन. वैद्यकीय महाविद्यालयाला दान करण्यात आला.

यावेळी प्राचार्य डॉ. एन. एस. महांतशेट्टी आणि शरीर रचना विभाग प्रमुख डॉ. शिल्पा यांनी शरीर रचना विभागासाठी आदरपूर्वक मृतदेह स्वीकारला. नेत्र भांडाराचे समन्वयक डॉ. शिवानंद बुबनाळे, त्वचा भांडाराचे समन्वयक डॉ. राजेश पोवार, रामण्णावर ट्रस्टचे सचिव डॉ. महांतेश रामण्णावर यांनी कुण्णे कुटुंबाप्रती कृतज्ञता व्यक्त केली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली व मोठा आप्तपरिवार आहे.

अवयवदान आणि शरीर दान याविषयी अधिक माहितीसाठी डॉ. रामण्णावर चॅरिटेबल ट्रस्टशी 9242496497 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Tags: