कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पोलिसांची कारवाई
कर्नाटक विधानसभा निवडणूक शेवटच्या टप्प्यात असताना महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर 88 लाख रुपयांची रोकड असलेली कार पोलिसांनी पकडली आहे. अक्कलकोट तालुक्यातील तोळनूर गावातील चेक पोस्टवर रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली आहे.
कर्नाटक निवडणुकांच्या अनुषंगाने महाराष्ट्राने कर्नाटक सीमेवर चेक पोस्ट तयार केले आहेत. या चेक पोस्टवरुन कर्नाटकात जाणाऱ्या गाड्यांची कसून तपासणी केली जात आहे. काल (5 मे) रात्री उशिरा एम. एच. 13 डीजे 7545 ही कार तोळनूर चेक पोस्टवर पोलिसांनी अडवली. गाडीची तपासणी केली असताना लोखंडी पेटीत 88 लाख रुपयांची रोकड असल्याचे पोलिसांना आढळून आली.
गाडी आणि रोकड ताब्यात
गाडी चालकाला या रकमेसंदर्भात विचारले असता त्याने सुरुवातीला उडवा उडवीची उत्तरे दिली. नंतर एटीएममध्ये ही रक्कम भरण्यासाठी नेत असल्याचे सांगितले. पोलिसांनी या संदर्भात त्याला पुरावा मागितला असता त्याने कोणताही पुरावा सादर केला नाही. त्यामुळे पोलिसांनी गाडी आणि रोकड ताब्यात घेतली असून आयकर विभागाला या संदर्भात कळवण्यात आले आहे. आयकर विभागाच्या चौकशीनंतर या रकमेचे पुरावे असल्यास सोडण्यात येईल अन्यथा गुन्हा दाखल करुन पुढील कारवाई करण्यात येईल, अशी माहिती अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश स्वामी यांनी दिली.


Recent Comments