40 पर्सेंट कमिशनचा भ्रष्टाचार करणाऱ्या भाजपला 40 हा आकडा फार आवडतो. त्यांना या निवडणुकीत 40च जागांपुरती मर्यादित ठेवा, लोक कल्याणाचा ध्यास घेतलेल्या काँग्रेसला बहुमताने विजयी करा असे आवाहन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केले.

यमकनमर्डी मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार सतीश जारकीहोळी यांच्या प्रचारासाठी बेळगावजवळील भूतरामनहट्टी येथे आज राहुल गांधी यांची भव्य जाहीर सभा झाली. यावेळी बोलताना राहुल गांधी पुढे म्हणाले, गेल्या 3-4 वर्षांत कर्नाटकात भाजप सरकारचा भयानक भ्रष्टाचार जनतेने पाहिला आहे. 40 पर्सेंट कमिशनबाबत कंत्राटदार संघटनेने थेट पंतप्रधानांना पत्र लिहून तक्रार करूनही अजूनही मोदींनी त्याची दखल घेतलेली नाही. डिंगळेश्वर स्वामीजींनीदेखील या सरकारच्या भ्रष्टाचारावर जाहीर टीका केली. वास्तविक पाच वर्षांपूर्वी कर्नाटकातील जनतेने काँग्रेसला जनादेश दिला होता. मात्र घोडेबाजार करून, आमदार विकत घेऊन चोरी करून सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने लोकांची चोरीच केली. लोकांना लुटले. पीएसआय भरती घोटाळा, शिक्षक भरती घोटाळा, अभियंता भरती, सहकारी बँक घोटाळा अशा एकापाठोपाठ एक घोटाळ्यांची मालिकाच भाजपने लावली. देशातील सर्वात भ्रष्ट सरकार कर्नाटकातील भाजप सरकार आहे असा आरोप राहुल गांधी यांनी केला.
पंतप्रधान मोदी येतात, बडीबडी आश्वासने देतात, अन निघून जातात. त्यांच्या सरकारच्या घोटाळ्यांवर, भ्रष्टाचारावर एक शब्दही बोलत नाहीत. दिलेला शब्द पाळत नाहीत. वर्षाला दोन कोटी रोजगार निर्मितीचे, प्रत्येक नागरिकांच्या खात्यात 15 लाख रु भरण्याचे त्यांचे आश्वासन कुठे गेले असा सवाल राहुल गांधी यांनी केला. त्यांच्या काळात महागाई गगनाला भिडली, गॅस सिलेंडर 400 रुपयांवरून 1200 वर पोहोचला. मनमोहन सिंह यांच्या काळात पेट्रोल 60 रुपये लिटर होते, ते भाजपच्या काळात 100 रुपयावर पोहोचले. सर्वसामान्य माणसाला, महिलांना भाजपने जगणे कठीण करून सोडले असा आरोप करून काँग्रेस सत्तेवर आल्यावर लोकांना दिलासा देईल असे त्यांनी सांगितले. काँग्रेसच्या 5 गॅरंटीचा उल्लेख करून ही सर्व आश्वासने काँग्रेस सरकारच्या मंत्रिमंड्ळाच्या पहिल्या बैठकीतच मंजूर करण्यात येतील. त्याचप्रमाणे राज्यातील सरकारी खात्यातील 2.5 लाख पदे भरण्याचे तसेच 10 लाख रोजगार निर्माण करण्यात येतील असे ते म्हणाले. सतीश जारकीहोळी हे जमिनीवर पाय असणारे, गोरगरिबांविषयी कळवळा असणारे नेते आहेत. त्यांना यमकनमर्डी मतदारसंघातून प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहनही राहुल गांधी यांनी केले.
यावेळी बोलताना उमेदवार सतीश जारकीहोळी म्हणाले की, गेल्या 3 निवडणुकांत तुम्ही मला आशीर्वाद देऊन सेवा करण्याची संधी दिली आहे. त्याची जाणीव ठेवून मतदारसंघात मी अनेक विकासकामे केली आहेत. आता चौथ्यांदा आशीर्वाद देऊन पुन्हा तुमच्या सेवेची संधी द्या असे आवाहन केले.
प्रारंभी केपीसीसी कार्याध्यक्ष सलीम अहमद यांनी स्वागत केले. यावेळी व्यासपीठावर बेळगाव उत्तर मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार आसिफ उर्फ राजू सेठ, माजी मंत्री वीरकुमार पाटील, शाम घाटगे, काँग्रेस बेळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्ष विनय नावलगट्टी, चिक्कोडी ग्रामीण जिल्हाध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे आदी मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments